न्हावेलीतील रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत
उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी वेधले लक्ष : चतुर्थीनंतर काम पूर्णत्वास नेण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन
न्हावेली / वार्ताहर
न्हावेली नागझरवाडी ते चौकेकरवाडी या साडेतीन किलोमीटर रस्त्याचे काम तीन वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सदर रस्त्याला एका बाजूनेच गटार खोदण्यात आला. त्यामुळे रस्त्यावर माती, दगड येत असल्यामुळे ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. रस्त्याचे काम तीन वर्षे अपूर्ण अवस्थेत असल्याने न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तत्काळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.यावेळी न्हावेली तंटामुक्ती समिती अध्यक्ष गजा दळवी, युवा सामाजिक कार्यकर्ते समीर पार्सेकर, ओम पार्सेकर, रुपेश नाईक, तुकाराम पार्सेकर, अमोल पार्सेकर, राज धवण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
नागझरवाडी ते चौकेकरवाडी दरम्यान पार्सेकरवाडी,देऊळवाडी, टेमवाडी अशा वाड्या येत असून येथून रहदारी मोठी असते. रस्त्याच्या अपूर्ण अवस्थेतील कामामुळे रस्त्यावर दगड, माती अपघात घडलेत. तसेच रस्त्यावरील पाणी ग्रामस्थांच्या घरातही गेले. तर ईस्वटी ब्राह्मण मंदिराजवळ सखल भागाला रस्त्यावर तलावाचे स्वरूप निर्माण होते. रस्त्याच्या दुतर्फा झुडपांचे साम्राज्य असल्याने समोरून येणारे वाहनही स्पष्ट दिसत नसल्याने अपघातही होतात. अशा अनेक समस्या उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कुडाळ कार्यकारी अभियंता रमाकांत सुतार यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येत अपूर्णावस्थेतील कामाची पाहणी केली. तसेच गटारांची व झुडपांची सफाई चतुर्थी पूर्वी करणार तर गटाराचे बांधकाम व मंदिरासमोरील सखल भागावर चतुर्थी नंतर काम करणार असे आश्वासन अधिकाऱ्यांनी न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांना दिले.