अनमोड घाट-गोवा हद्दीतील कोसळलेल्या ठिकाणच्या रस्ताकामाला प्रारंभ
वार्ताहर /रामनगर
अनमोड घाटातील गोवा हद्दीत असणाऱ्या दूध सागर मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर चार जुलै रोजी अचानक रस्त्याला चीर जाऊन रस्त्याचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर आणखीन एका ठिकाणी पूर्ण रस्ताच कोसळल्याने पाच जुलैपासून मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी छोटी वाहने तसेच अत्यावश्यक सेवा वगळून इतर वाहनांना मार्ग बंद केला होता. रस्ता कोसळलेल्या ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे तसेच कोसळल्या मुख्य कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे त्याच स्थितीत बरेच दिवस रस्ता तसाच राहिला. दोन महिन्यानंतर सदर रस्त्यावर रस्ता पुन्हा कोसळू नये तसेच मजबूत व्हावा या दृष्टिकोनातून स्लीबिंग प्रक्रियेतून रस्त्याच्या दोन्ही बाजूने दहा एमएमचे रॉड घालून रस्ता मजबूत करण्यात आला होता.
त्यानंतर अवजड वाहनधारकांनी अवजड वाहनांना या मार्गावर सोडण्याची मागणी केल्याने कोसळलेल्या ठिकाणी पत्र्याची संरक्षण भिंत घालून अवजड वाहनांना एकेरी मार्गानी सोडण्यात आले होते. आता साधारणता चार महिन्याच्या कालावधीनंतर रस्ता कोसळलेल्या ठिकाणी मुख्य कामाला प्रारंभ झाला आहे. सदर कामाला सेंट्रल गव्हर्मेंट येथून स्पेशल फंडातून या ठिकाणी चार कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे सध्या कोसळलेल्या ठिकाणी मायक्रो पॉलीनच्या माध्यमातून बोरवेल मशीनद्वारे मोठमोठे पाईप जमिनीत मजबुतीसाठी घालण्यात येत आहेत. पूर्ण रस्ता काम होण्यासाठी अजून दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे पीडब्ल्यूडी मुख्य अभियंता बोबे यांच्यातर्फे सांगण्यात आले. सध्या पावसाचा माराही कमी झाला असल्याने यापुढे काम युद्ध पातळीवर चालू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.