दिवसेंदिवस रस्ते वाहतूक समस्या बनतेय जटिल
बेळगाव : बेळगाव शहरातील रस्ते वाहतूक समस्या व वाहन थांब्यांचे स्थान, वाढते प्रदूषण यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. शहरात पाहावे तेथे मोठमोठी अपार्टमेंट्स उभी राहत आहेत. परंतु तेथे राहणाऱ्या लोकांनी वाहने कोठे पार्क करायची? हा प्रश्नच आहे.
आजच्या काळात नोकरदारांची संख्या वाढली आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही घरगुती कामासाठी, नोकरीसाठी व अन्य कामांसाठी घराबाहेर पडावे लागते. मात्र, प्रत्येकालाच दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या गर्दीला तोंड देताना पुरेवाट होत आहे. वाहनांच्या गर्दीमुळे पार्किंग करायला जागाच मिळत नाही. परिणामी वाहनधारक वाटेल तेथे रस्ता अडवून गाड्या लावतात. बऱ्याच वेळा वाहनधारकांसोबत शाब्दिक वादही होतात.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुमजली व बहुमजली इमारती उभ्या राहिल्याने आज प्रत्येक घरी किमान दोन-तीन वाहने असतातच. वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोटमाळ्यावर पार्किंगची सुविधा असा फतवा काढला जातो. पण त्याचा काही उपयोग होत नाही.
वाहनांच्या गर्दीमुळे हवेच्या प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ होऊन लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. प्रदूषणामुळे डोळ्यातील पाणी (अश्रु) तयार करणाऱ्या ग्रंथी काम करेनाशा झाल्यात. त्यामुळे डोळे सुकून रखरखतात व दृष्टीवर वाईट परिणाम होपे. त्याला वैद्यकीय परिभाषेत ड्राय आय सिंड्रोम म्हटले जाते. यासाठी पाच-सहा वेळा ड्रॉप्स घालण्याचा सल्ला दिला जातो.
या प्रदूषणाबरोबरच ध्वनिप्रदूषणही तितकेच त्रासदायक ठरत आहे. आधीच गर्दी आणि त्यात वाहनांचे कर्कश व विकृत वाटणारे आवाज यामुळे नागरिक भांबावून जातात. रात्रीच्या वेळी सर्व वाहने हॅलोजन एलईडी लाईट्स हेडलाईटसह चालवतात. त्यामुळे समोरून येणाऱ्या लोकांना काही दिसत नाही.
आधीच लहान रस्ते, त्यात दुहेरी वाहतूक, एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या टपऱ्या व पदपथावर फुटकॉल्स व कपड्यांचे सेल्स हे चित्र सर्वत्र दिसते. पदपथावर आक्रमण झाल्याने चालत जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे.
अलीकडेच एका मोठ्या वाहन उत्पादन कंपनीने पुढील वर्षी आपण 25 लाख गाड्या मार्केटमध्ये आणणार असल्याचे जाहीर केले. एलन मस्कच्या इलेक्ट्रिक गाड्याही येणार आहेत. जर प्रशासन योग्य रस्ते देऊ शकत नाही तर किमान त्यांनी वाहनांची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन तरी थांबवावे.
लोकसंख्या नियंत्रणासाठी तर सरकार कोणतेच कायदे करत नाही. एकूणच प्रशासनाचा कारभार ‘घोषणा उदंड आणि काम थंड’ असा आहे. परंतु याचे परिणाम आगामी काळात गंभीर भोगावे लागणार आहेत. तत्पूर्वी शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करणे आवश्यक आहे.