अनगोळ येथील रस्त्यांची डागडुजी
बेळगाव : अनगोळमधील रस्त्यांची डागडुजी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी संत मीरा शाळेसमोरील रस्त्यावर पडलेल्या खाड्यांमध्ये पॅचवर्क करण्यात आले. ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या-त्या ठिकाणी डांबर घालून खड्डे बुजविण्यात आले. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावर्षी मे मध्यावधीपासून पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. सततच्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. परंतु दुरुस्तीचे काम करणे अशक्य होते. त्यामुळे तात्पूरत्या स्वरूपात चिपिंग, तसेच माती टाकून रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले होते. अनगोळमधील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खाड्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय होत होती. त्यामुळे मंगळवारपासून रस्त्यावर पॅचवर्क करण्याचे काम सुरू झाले. भाग्यनगर, संत मीरा शाळा रोड, अनगोळ-वडगाव रोड या रस्त्यांवर खाड्यांमध्ये डांबरीकरण करण्यात आले.