अलतगा फाटा ते अगसगा रस्ता बनला धोकादायक
डांबरीकरणाची खडी सांडल्याने वाहनचालकांचे अपघात
बेळगाव : अलतगा फाटा ते अगसगापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर डांबरीकरणाची खडी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील खडी या रस्त्यावर पडत असल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून वाहतूक करताना दुचाकीचे अनेक अपघात होत आहेत. एखाद्याचा जीव जाण्यापूर्वी या रस्त्यावरील वाहतूक थांबवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. अलतगा परिसरात अनेक क्वारी आहेत. या ठिकाणाहून डांबरीकरणासाठी लागणारी खडी वाहतूक केली जाते. खडी वाहतूक करताना वाहनातील खडी रस्त्यावर पडत असल्यामुळे जागोजागी उंचवटे तयार झाले आहेत. यामुळे दुचाकी बाजूला घसरत असून अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी तर या उंचवट्यांचा अंदाज न आल्याने अनेक जण जायबंदी होत आहेत.
डांबर वाहतूक थांबवा
या रस्त्यावरून डांबर वाहतूक करणे धोकादायक ठरत असल्याने ती तात्काळ थांबवण्याची मागणी केली जात आहे. तसेच रस्त्यावर तयार झालेले उंचवटेही हटवावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
उंचवटे त्वरित हटवावेत
अलतगा फाटा ते अगसगा या दरम्यान डांबरीकरणासाठी खडी वाहतूक करणारे ट्रक सुसाट वेगाने जात आहेत. यामुळे बऱ्याच ठिकाणी खडी पडून उंचवटे निर्माण झाले आहेत. या उंचवट्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीचे अपघात होत आहेत. त्यामुळे संबंधित कंत्राटदार तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पुरवून हे उंचवटे त्वरित हटवावेत.
- मनोहर हुंदरे, ग्रामस्थ.