रस्ता खोदकामाने घेतला महिलेचा बळी
डोक्यावरून चाक गेल्याने महिला जागीच ठार : परवानगीशिवाय सुरु आहे वीज खात्याचे खोदकाम
डिचोली/ प्रतिनिधी
न्हावेली सांखळी येथे वीज भूमिगत केबलिंगसाठी खोदलेल्या रस्त्याने एका महिलेचा बळी घेण्याची घटना घडली. खोदल्यामुळे अरूंद व असुरक्षित बनलेल्या या रस्त्यावर ट्रक व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकलच्या मागे बसलेली सुर्लतील 46 वर्षीय महिला रस्त्यावर पडली व तिच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. या घटनेची व रस्ता खोदकामाची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार जीए 04 टि 0612 हा ट्रक न्हावेली येथून सुर्लच्या दिशेने जात होता. जीए 04 पी 9899 ही मोटरसायकल सुर्ल येथून न्हावेलीच्या दिशेने येत असताना समोरासमोर टक्कर होऊन सदर अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलच्या मागे बसलेल्या वृशाली संजय सुर्लकर या महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या.
परवानगी नसताना केले खोदकाम
या रस्त्याच्या खोदकामासाठी अद्याप सार्वजनिक बांधकाम खात्याने वीज खात्याला भूमिगत केबल्ससाठी रस्ता खोदण्यास परवानगी दिलेली नाही. तरीही वीज खात्याकडून रस्ता बेकायदेशीररित्या खोदण्यात आलेला आहे. तो रस्त्याच्या मधोमध खोदण्यात आल्याने ट्रक व मोटरसायकल या धोकादायक व अरूंद रस्त्यावर समोरासमोर आल्यावर मोटरसायकल चालकाचा ताबा गेला व हा अपघात घडला.
या अपघाताची सरकारने गंभीर दखल घेताना अपघातास जबाबदार असलेल्यावर कारवाई करावी. गेल्या सुमारे 25 दिवसांपासून हे रस्ते खोदून धोकादायक स्थितीत ठेवले आहेत. या रस्त्यामुळे हा अपघात घडला आहे, अशी माहिती न्हावेलीतील विश्वंभर गावस यांनी दिली. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. या अपघाताचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पोलिसांनी हाती घेतली असून ट्रकचालकास अटक करण्यात येणार आहे.
बांबोळी येथील अपघातात युवक ठार
बांबोळी येथे ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून ट्रक चालकाच्या विरोधात आगशी पोलिसस्थानकाने भारतीय न्याय संहितेच्या कलम 106 (1) तसेच एमव्ही कायदा कलम 201 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
दुचाकी स्वाराचे नाव अंनत पुरखे (31 वर्षे, साळगाव) असे आहे. संशयित ट्रक चालकाचे नाव विनोद राजबभर (35 वर्षे, उत्तर प्रदेश) असे आहे. दोन्ही वाहने मडगावहून पणजीच्या दिशेने येत होती. बांबोळी सीबीआय कार्यालयाजवळ पोचताच ट्रकने दुचाकीला धडक दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमीला गोमेकॉत नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून उपनिरीक्षक शुभम कोरगावकर पुढील तपास करीत आहेत.............................................................................................................