भुयारी मार्गाच्या कामामुळे रस्ता खचण्याचा धोका
कंत्राटदाराचा निष्काळजीपणा : असोगा रस्ता बंद होण्याची भीती, रेल्वे ट्रॅकलाही धोक्याची शक्यता
खानापूर : खानापूर-असोगा रस्त्यावर रेल्वेस्थानकानजीक भुयारी मार्गाच्या निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी खोदकाम करून काँक्रीट घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र ही जमीन पूर्णपणे पाणथळ आहे. या ठिकाणी भुयारी मार्गासाठी जवळपास तीस फूट खोल खोदकाम करण्यात आले आहे. या खोदलेल्या जागी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने खानापूर, असोगा रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे असोगा रस्ता बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. जर रस्ता खचल्यास लागून असलेल्या रेल्वे ट्रॅकलाही धोका पोहोचण्याचा संभव आहे. कंत्राटदाराने गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वेस्थानकानजीक भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात केली आहे.
उपाययोजना करणे गरजेचे
या साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. जर रस्ता खचल्यास हे पाणी रेल्वे ट्रॅकच्या मुळाशी जाण्याचा धोका आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे रेल्वे ट्रॅकच्या खालील मातीही भुसभुशीत होऊन रेल्वे ट्रॅकही खचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी कंत्राटदाराने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी खोदकाम केलेले आहे. तेथील पाण्याचा उपसा करून ते नाल्यात सोडण्याची उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा असोगा रस्ता येत्या दोन दिवसांत खचण्याचा धोका आहे.