‘रो-को’...रोखता रोखेनात !
कसोटी व टी-20 तून निवृत्ती घेतलेले रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीवरही पडदा पडायला आलाय अन् खुद्द निवड समिती नि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरलाही तेच हवंय असं चित्र उभं राहिलं होतं...त्या दोन्ही खेळाडूंना जरी 2027 मधील विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे वेध लागलेले असले, तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे सामने ही त्यांना शेवटची संधी असल्याचं मानलं जात होतं...मात्र रोहितनं पहिल्याच सामन्यात अर्धशतक अन् विराटनं त्याही पुढं जात लागोपाठ दोन शतकं फटकावून आपल्या विरोधकांना सणसणीत दणका दिलाय, ‘रो-को’ला रोखणं कठीण असल्याचा संदेश दिलाय...
विराट कोहली व रोहित शर्मा...या दोघांचा एकदिवसीय सामन्यांतील ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपट चाललाय तो गेल्या सुमारे 16 वर्षांपासून...त्यात समावेश एकूण 102 डावांचा नि 5619 धावांचा...‘रो-को’ म्हणून विख्यात असलेल्या जोडीनं शतकी भागीदाऱ्या केल्याहेत त्या 20, तर 50 हून अधिक धावांची भर घातलीय ती 17 वेळा...या यादीत पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली (8227 धावा) यांनी ताबा मिळविलाय अन् माहेला जयवर्धने-कुमार संगाकारा (5992 धावा) विसावलेत दुसऱ्या स्थानावर...
रांचीतील पहिल्या एकदिवसीय लढतीत विराट कोहलीनं अतिशय दर्जेदार शतक (135 धावा) झळकावलं ते 120 चेंडूंत, तर रायपूर येथील सामन्यात 93 चेंडूत फटकावल्या त्या 102 धावा...कोहलीनं एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग दोन शतकं झळकावण्याची ही 11 वी खेप. या स्वरुपाच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आलेलीं नाहीये. 50 षटकांच्या क्रिकेटमधील त्याचं जबरदस्त सातत्य यातून जाणवतं. या प्रतापाच्या जोरावर विराट आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान मिळविण्याच्या जवळ पोहोचलाय अन् रोहित शर्मापेक्षा तो मागं आहे फक्त 32 गुणांनी...
गेल्या दशकाच्या अखेरीस विराट कोहलीनं तीन वर्षांहून अधिक काळ अग्रक्रमांक स्वत:जवळ ठेवला होता. एप्रिल, 2021 मध्ये पाकिस्तानच्या बाबर आझमनं त्याला तेथून हटविल्यापासून तो परत त्याला गवसणी घालू शकलेला नाही...झारखंडच्या राजधानीत रोहित शर्मानंही नोंद केली षटकार हाणण्याच्या बाबतीत .जागतिक विक्रमाची (269 डावांत 352 षटकार)...विराटनं 52 वं नि 53 वं एकदिवसीय शतक फटकावत क्रिकेटच्या कुठल्याही स्वरुपातील सर्वाधिक शतकांचा महान सचिन तेंडुलकरचा जागतिक विक्रम मोडीत काढलाय (कसोटी सामन्यांत 51 शतकं)...44 वेळा सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावणाऱ्या कोहलीच्या कारकिर्दीतील ते ठरलंय एकंदरित 84 वं शतक...
मग विराट कोहली म्हणाला, ‘माझा सामन्यापूर्वी भरपूर तयारी करण्यावर विश्वास नाहीये. सारा भर असतोय तो मानसिकदृष्ट्या सज्ज राहण्यावर’...रोहित शर्माप्रमाणं विराटनंही लक्ष केंद्रीत केलंय ते 2027 साली होऊ घातलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेवर...भारताच्या तयारीनं मात्र अजूनही अपेक्षित गती घेतलेली नाहीये. सारं चित्र पाहिल्यास असं दिसतंय की, खुद्द सध्याचं संघ व्यवस्थापन अन् निवड समिती यांचा विश्वास डळमळायला लागलाय. स्पर्धा दक्षिण आफ्रिका आयोजित करणार असल्यानं तेथील खेळपट्ट्या फलंदाजांना साथ देण्याची शक्यता तशी कमीच...
रोहित शर्माचं कर्णधारपद शुभमन गिलच्या हाती देण्यात आलं नि तीं स्थित्यंतराची स्वाभाविक प्रक्रिया असली, तरी तशी दिसली मात्र नाही...अनेक विश्लेषकांची अजूनही इच्छा आहे ती ‘रो-को’ जेडी अयशस्वी होण्याची, संघात त्यांना स्थान न मिळण्याची. मात्र त्या दोन अनुभवी फलंदाजांचा ‘फॉर्म’ 2027 पर्यंत टिकेल काय, असा प्रश्न पुन्हा-पुन्हा उपस्थित करणं अपमानास्पद. आता वेळ आलीय ती ही सारी फालतू चर्चा थांबविण्याची. कारण त्यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून सातत्यानं फलंदाजी केलीय नि गौतम गंभीरचे चेले मात्र धावांसाठी झगडताहेत...विराट-रोहित नि गंभीर या दोन संस्कृतींत प्रचंड अंतर आणि त्याचा परिणाम झालाय तो ड्रेसिंग रूममधील वातावरणावर...
गौतम गंभीरचं व्यक्तिमत्व, त्याची मानसिकता साऱ्यांनाच माहितंय. पण sकित्येकांना झटका बसलाय तो निवड समितीचे अध्यक्ष नि भारताचे माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकरही त्याच्या मागं जात असल्यानं...गंभीरला डावपेच रचण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य हवंय आणि तसं ते मिळणं रोहित शर्मा व विराट कोहलीच्या उपस्थितीत निव्वळ अशक्य...एकदिवसीय लढतीत भारतीय क्रिकेट संघाला प्रेरणा मिळू शकेल ती एम. एस. धोनीनं विराट कोहलीला नेतृत्व सोपविल्यानंतर केलेल्या मार्गदर्शनातून. निवड समितीचे तत्कालीन अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांच्या मते, वेळ आलीय ती विराट नि रोहित यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याची, त्यांचा सल्ला घेण्याची आणि त्यांना शुभमन गिलसह नवीन खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची संधी देण्याची. या पार्श्वभूमीवर रवी शास्त्राr-कोहली-धोनी या त्रिकुटातील समन्वय आठवतोय ?...
आगरकर यांच्या मते, शुभमन गिलला बढती देण्यात आलीय ती येऊ घातलेल्या दिवसांत एकदिवसीय सामन्यांची संख्या कमी असल्यामुळं. त्याला स्थिर होण्याची संधी मिळावी ही त्यामागची कल्पना. परंतु अजित ‘रो-को’ जोडीनं स्थानिक स्पर्धांत खेळण्याच्या गरजेवर मात्र पुन्हा पुन्हा भर देताहेत (कोहलीनं विजय हजारे चषक स्पर्धेत, तर रोहित शर्मानं निवृत्तीनंतरही सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत खेळण्याचं मान्य केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालंय)...काही विश्लेषकांच्या मतांनुसार, ‘विराट व रोहित यांच्या मानसिकतेशी खेळणं आता बंद करायला हवंय. त्यांनीच बहुतेक वेळा चमक दाखविलीय, तर नवीन खेळाडू अक्षरश: फ्लॉप ठरलेत. त्यांच्या खेळण्याचा लाभ नवोदितांना निश्चितच मिळेल, पण त्याचा अर्थ पुन्हा पुन्हा या जोडीनं देशी स्पर्धांत खेळायला हवं या बाबीचा जप’ करणं योग्य नव्हे. धोनीला कुणीही कधी स्थानिक स्पर्धांत खेळायला सांगितल्याचं आठवत नाहीये’..
भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक म्हणतात, ‘विराट छान खेळतोय आणि दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे व नामिबिया यांनी आयोजित केलेल्या 2027 सालच्या विश्वचषकाला अजून बाकी आहेत ते तब्बल 22 महिने. या पार्श्वभूमीवर त्याच्या भविष्यकाळासंबंधी परत-परत प्रश्न उपस्थित करणं अत्यंत चुकीचं’....दक्षिण आफ्रिकेचा 25 वर्षीय अष्टपैलू खेळाडू मार्को जॅनसेन याच्या शब्दांत सांगायचं झाल्यास, ‘कोहलीला खेळताना पाहून आनंद झाला. कारण यापूर्वी मी त्याचं दर्शन घेतलं होतं ते दूरचित्रवाणीवर. शिवाय 2017 साली नेट बॉलर म्हणून त्याच्यासोबत सरावही केला होता. त्यानं ड्राईव्ह, पूल, कट, फ्लीक दर्जेदार पद्धतीनं हाणले. मला वाटतंय की, विराटमध्ये फारसा बदल झालेला नाहीये’. जॅनसेनच्या मताकडे सारे रसिक सहमत झाल्याशिवाय राहणार नाहीत !
अचाट विराट...
- विराट कोहलीनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 46 शतकं झळकावलीत आणि यादरम्यान त्यानं क्रिकेटच्या कोणत्याही स्वरुपात एकाच क्रमांकावर सर्वाधिक शतकं फटकावण्याच्या बाबतीत त्याचा आदर्श सचिन तेंडुलकरला मागं टाकलंय. सलामीवीर म्हणून तेंडुलकरनं नोंदविली होती ती 45 शतकं...
- विराटनं मायदेशातील एकदिवसीय सामन्यांत 25 शतकांची नोंद केलीय ती 122 डावांत. यापूर्वी सचिननं 20 शतकं फटकावली होती...
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोहलीनं सातव्यांदा शतकाला गवसणी घातलीय. यापूर्वी तेंडुलकर व डेव्हिड वॉर्नरनं असा पराक्रम बजावला होता तो प्रत्येकी पाचदा..


- राजू प्रभू