सिडनीत ‘रो-को’ चा हिट शो
टीम इंडियाचा 9 गड्यांनी विजय : मालिका मात्र 2-1 ने कांगारुकडे
रोहितचे 33 वे वनडे शतक तर विराटचीही अर्धशतकी खेळी : हर्षित राणाचा विकेटचा चौकार
वृत्तसंस्था/ सिडनी
रोहित शर्माची नाबाद शतकी खेळी आणि विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा वनडे सामना 9 विकेट्सनी जिंकला. भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यातील पराभवासह मालिका गमावली खरी पण तिसऱ्या सामन्यात व्हाइटवॉशची नामुष्की टाळताना रोहित-विराट जोडीने खास शो दाखवत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेचा शेवट गोड केला.
प्रारंभी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय भारतीय गोलंदाजानी चुकीचा ठरला. हर्षित राणाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन संघाचा डाव 46.4 षटकांत 236 धावांत आटोपला. यानंतर विजयासाठीचे लक्ष्य भारतीय संघाने एका गड्याच्या मोबदल्यातच पार केले. मालिकेत शानदार खेळी साकारणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. अर्थातच, मालिका गमावल्यानंतर व्हाइटवॉशची नामुष्की टाळताना दोघांनी मिळून सिडनीच्या मैदानावरील शेवटचा सामना अविस्मरणीय केला. आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ही जोडी खेळणार की, नाही? असे प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वनडे कारकिर्दीतील भविष्यासंदर्भात ज्या उलट सुलट चर्चा रंगत आहेत, त्या चर्चेला ब्रेक लावणारी खेळी या दोघांनी सिडनीच्या मैदानात साकारली.
रोहितचे 33 वे वनडे शतक, विराटचीही अर्धशतकी खेळी
237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाला 69 धावांवर पहिला धक्का बसला. कर्णधार शुभमन गिल फक्त 24 धावा करून माघारी परतला. संपूर्ण मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. तीन डावांत तो केवळ 43 धावाच करू शकला. गिल बाद झाल्यानंतर मात्र विराट कोहली आणि रोहित शर्माने शानदार खेळी साकारत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रोहितने धमाकेदार खेळी साकारताना 125 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारासह नाबाद 121 धाव केल्या. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील 33 वे आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 50 वे शतक ठरले. विराटनेही त्याला चांगली साथ देताना 81 चेंडूत 7 चौकारासह नाबाद 74 धावा केल्या. या दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी 168 धावांची भागीदारी केली. या जोरावर टीम इंडियाने 38.3 षटकांत विजय मिळवत मालिकेत व्हाइटवॉश टाळला. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने 1 बळी घेतला.
हर्षित राणाचा विकेट्सचा चौकार
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांनी चांगली सुरुवात करुन दिली. ही जोडी मैदानात सेट झालेली असतानाच 61 धावांवर भारताला सिराजने पहिले यश मिळवून दिले. हेड 29 धावा करुन माघारी परतला. पाठोपाठ मिचेल मार्शही 41 धावांवर आऊट झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव थोडासा डळमळीत झाला. पण, रेनशॉ आणि अॅलेक्स कॅरी यांनी चौथ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली, जी हर्षित राणाने अॅलेक्स कॅरीला बाद करून मोडली. त्यानंतर रेनशॉ अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. रेनशॉ व्यतिरिक्त मॅथ्यू शॉर्ट 30, अॅलेक्स कॅरी 24, कूपर कॉनोली 23, नॅथन एलिस 16 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केली. भारताकडून, हर्षित राणाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरने दोन विकेट्स तर सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 46.4 षटकांत सर्वबाद 236 (मिचेल मार्श 41, हेड 29, मॅथ्यू शॉर्ट 30, रेनशॉ 56, कॅरी 24, हर्षित 39 धावांत 4 बळी, वॉशिंग्टन सुंदर 2 बळी).
भारत 38.3 षटकांत 1 बाद 237 (रोहित शर्मा 125 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारासह नाबाद 121, शुभमन गिल 24, विराट कोहली 81 चेंडूत 7 चौकारासह नाबाद 74, हेजलवूड 1 बळी).
रोहित-विराटची विक्रमांची बरसात
वाढलेलं वजन आणि सुटलेलेल्या पोटामुळे रोहित शर्मा तर वाढते वय, खराब फॉर्ममुळे विराट कोहली हे दोघेही 2027 मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नाहीत, अशी चर्चा अनेकदा रंगत असायची. अशातच सिडनीच्या मैदानात रोहित शर्माने नाबाद शतकी खेळी साकारत अविश्वास दाखवणाऱ्या सर्व टीकाकारांची तोंडं बंद करत आपल्यात अजूनही बरेच क्रिकेट बाकी असल्याचे आणि आपल्या खेळाचा क्लास अजूनही कायम असल्याचे दाखवून दिले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी शतकी भागीदारी करुन भारतीय क्रिकेट रसिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण केली. या सामन्यातच दोघांनी अनेक विक्रमांची बरसात केली आहे.
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतके : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 शतके केली आहे. यानंतर रोहित शर्माचा नंबर लागतो. रोहितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध नववे शतक केले आहे. सचिन आणि रोहित संयुक्तरित्या प्रथमस्थानी आहेत तर विराटच्या नावावर 8 शतकांची नोंद असून तो दुसऱ्या स्थानी आहे.
- विराट-रोहितची विक्रमी शतकी भागीदारी - विराट आणि रोहित या दोघांनी एकदिवसीय सामन्यात 19 वेळा 100 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. यामुळे वनडेत सर्वाधिकवेळा शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्यांमध्येही या दोघांची जोडी तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.
वनडेत सर्वाधिकवेळा शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्या
26 वेळा - सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली
20 वेळा - तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकारा
19 वेळा - विराट कोहली आणि रोहित शर्मा.
- रोहितचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 50 वे शतक - शनिवारी टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतकी खेळी साकारली. दरम्यान, रोहितचे हे वनडेतील 33 वे तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 50 वे शतक ठरले. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतके पूर्ण करणारा भारताचा सचिन तेंडुलकर (100) आणि विराट कोहली (82) यांच्यानंतरचा तिसरा खेळाडू आहे. रोहितच्या नावावर कसोटी, वनडे आणि टी 20 मिळून 50 शतकांची नोंद आहे.
- वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानी : विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. विराटने या सामन्यात 74 धावांची खेळी करत कुमार संगकाराला मागे टाकले आहे.
वनडेत सर्वाधिक धावा
18426 धावा - सचिन तेंडुलकर (463 सामने)
14235 धावा - विराट कोहली (305 सामने)
14234 धावा - कुमार संगकारा (404 सामने)
13704 धावा - रिकी पाँटिंग (375 सामने).
थँक यू ऑस्ट्रेलिया...!
सिडनी : ऑस्ट्रेलियात खेळणे कधीच सोपे नसते, पण प्रत्येक वेळी मी तिथे खेळताना प्राथमिक गोष्टींवर भर देतो. माझ्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवरच्या आठवणी खूप खास आहेत. उत्कृष्ट विकेट, सुंदर मैदान आणि उत्साही प्रेक्षक मला नेहमीच भावतात. मला क्रिकेट आजही खूप आवडतं आणि तेच प्रेम पुढेही कायम ठेवायचे आहे, असे रोहितने स्पष्ट केले. आम्ही ऑस्ट्रेलियात खेळायला परत येऊ की नाही, हे माहित नाही, पण मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. थँक यू ऑस्ट्रेलिया असे भावनिक शब्द वापरत तो ड्रेसिंग रुममध्ये गेला.
दुसरीकडे, विराट बोलताना म्हणाला, तुम्ही बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकता, पण खेळ नेहमीच तुमच्यावर नवीन प्रकाश टाकत असतो. काही दिवसांत मी 37 वर्षांचा होईन, पण माझी सर्वोत्तम कामगिरी धावांचा पाठलाग करताना येते. रोहितसोबत मोठी सामना जिंकणारी भागीदारी करणे छान होते. आम्ही दोघांनीही छान खेळ केला. अर्थातच, ऑस्ट्रेलियात यायला मला नेहमीच आवडते. या ठिकाणच्या अनेक गोड आठवणी आहेत. इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी येऊन आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद, असे म्हणत विराट-रोहितने ऑस्ट्रेलियाचे आभार मानले. रोहित-विराटचा हा त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचा ऑस्ट्रेलिया दौरा असणार आहे. यानंतर वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी जाणार नाही.