For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमचा पराभव ‘केल्या’स अराजक

07:00 AM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
आमचा पराभव ‘केल्या’स अराजक
Advertisement

राजद नेत्याची धमकी, त्वरित पोलिसांची कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/पाटणा (बिहार)

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची मतगणना शुक्रवारी होणार आहे. जर आमचा यंत्रणेकडून मुद्दाम पराभव घडवून आणण्यात आला, तर बिहारमध्ये अराजक माजणार आहे. बांगला देश, श्रीलंका आणि नेपाळमध्ये जे झाले, तेच बिहारमध्ये होईल, अशी जाहीर धमकी राष्ट्रीय जनता दलाचे नेते सुनिल सिंग यांनी दिली आहे. या धमकीनंतर त्वरित कारवाई करण्यात आली असून सुनिल सिंग यांच्या विरोधात एफआयआर (तक्रार) सादर करण्यात आली आहे. या निवडणुकीत जनतेने तिचा कौल दिला आहे. जनतेने महागठबंधनलाच विजयी केले आहे. आम्हाला बहुमत मिळणार हे निश्चित आहे.

Advertisement

तथापि, जर मतगणना प्रक्रियेत सहभागी अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर आमच्या विजयी उमेदवारांचा पराभव करण्याचे कारस्थान केले, तर जनता या यंत्रणेला क्षमा करणार नाही. आमचे मतदार रस्त्यांवर उतरतील आणि बिहारमध्ये बांगला देश, श्रीलंका आणि नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल. तसे झाल्यास हीच यंत्रणा त्यासाठी जबाबदार असेल. हे मतगणना अधिकाऱ्यांनी लक्षात टेवावे. आम्ही कोणतेही कारस्थान सहन करणार नाही. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत आमच्या अनेक उमेदवारांना, ते विजयी होत असतानाही यंत्रणेकडून पाडण्यात आले. त्यावेळी आम्ही गप्प बसलो. मात्र, यावेळी जनता स्वस्थ बसणार नाही, याची जाणीव संबंधितांनी ठेवावी, अशी भाषा सिंग यांनी उपयोगात आणली आहे.

संजदचा पलटवार

संयुक्त जनता दलाचे खासदार संजय झा यांनी सिंग यांनी सिंग यांची धमकी पोकळ असल्याचा पलटवार केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा निर्णय काय लागणार आहे, हे विरोधकांना माहीत आहे. विरोधकांना मतगणनेपूर्वीच त्यांचा पराभव डोळ्यांसमोर दिसत आहे. त्यामुळे ते बिथरले आहेत. म्हणून ते अशी भाषा करत आहेत. ही भाषा अयोग्य आहे. आमच्या मूल्यांकनाच्या अनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीला या निवडणुकीत विजय मिळणार आहे. विरोधकांनी त्यांचा पराभव झाल्यास तो मोकळ्या मनाने स्वीकारला पाहिजे. अशी धमकीची भाषा लोकशाहीत अमान्य आहे, असे प्रतिपादन खासदार संजय झा यांनी केले.

सुरक्षा व्यवस्था चोख

सिंग यांच्या धमकीनंतर बिहारचे पोलीस महासंचालक विनय कुमार यांनीही त्यांचे वक्तव्य केले आहे. मतगणना काळात आणि त्यानंतरही संपूर्ण बिहारमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे. पुरेशा प्रमाणात पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. कोठेही विजयाच्या मिरवणुका काढू दिल्या जाणार नाहीत. केंद्रीय निवडणूक आयोगाने जे दिशानिर्देश दिलेले आहेत, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. मतगणना शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी चिंता करु नये, असा विश्वास कुमार यांनी दिला आहे.

आज मतगणना

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतगणनेला आज शुक्रवारी सकाळी 8 वाजता प्रारंभ होत आहे. सर्व मतगणना केंद्रांवर सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. मतगणनेचा प्रारंभ झाल्यापासून चार ते पाच तासांमध्ये कल हाती येणार आहेत. मात्र, मतगणना प्रक्रिया पूर्ण होण्यास रात्री 10 ते 12 पर्यंत कालावधी लागू शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे. मतगणनेकडे साऱ्या देशाचे लक्ष आहे.

Advertisement
Tags :

.