For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिझवान, अमीर, जमालची अर्धशतके

06:19 AM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
रिझवान  अमीर  जमालची अर्धशतके
Advertisement

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरी कसोटी : पाकिस्तानच्या पहिल्या डावात 313 धावा : पॅट कमिन्सचे 61 धावांत 5 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी

येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या व शेवटच्या कसोटीत मोहम्मद रिझवान, आगा सलमान आणि आमेर जमाल यांच्या शानदार अर्धशतकी खेळीने पाकिस्तानची इज्जत वाचवली. एकवेळ अवघ्या 50 धावांत 4 विकेट गमावलेल्या पाकिस्तान संघाने या तीन फलंदाजांच्या झटपट अर्धशतकांच्या जोरावर संघाची धावसंख्या 300 च्या पुढे नेले. पाकचा पहिला डाव 313 धावांवर संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेरीस बिनबाद 6 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर 6 तर उस्मान ख्वाजा 0 धावांवर खेळत होते. ऑसी संघ अद्याप 307 धावांनी पिछाडीवर आहे.

Advertisement

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीरांना भोपळाही फोडता आला नाही. अब्दुल शफीकला स्टार्कने तर सईम आयुबला हॅजलवूडने बाद केले. बाबर आझमने (4 चौकारासह 26) कर्णधार शान मसूदला काही काळ साथ दिली मात्र तो पुन्हा एकदा पॅट कमिन्सचा बळी ठरला. 47 धावा झाल्या तोपर्यंत सौद शकील (5) यालाही कमिन्सने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शान मसूद चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता पण तो संघाची 96 धावसंख्या असताना मिचेल मार्शच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 3 चौकारासह 35 धावांची खेळी खेळली.

रिझवान, जमाल, अमीरची अर्धशतके

अर्धा संघ 100 धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि आगा सलमान यांनी वेगवान धावा काढण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 94 धावांची जलद भागीदारी झाली. रिझवानने 103 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारासह 88 धावांचे योगदान दिले. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या रिझवानचा अडथळा कमिन्सने दूर केला. सलमान आगाने त्याला चांगली साथ देताना 8 चौकारासह 53 धावा केल्या. रिझवान आणि सलमान बाद झाल्यानंतर आमेर जमालने दमदार खेळी केली. त्याने 97 चेंडूत 9 चौकार व 4 षटकारासह 82 धावा करत पाकिस्तानला 300 च्या पुढे नेले. आमिरला साजिद खान (15) आणि मीर हमजा (7) यांचीही चांगली साथ मिळाली. जमाला बाद झाल्यानंतर पाकचा पहिला डाव 77.1 षटकांत 313 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने पुन्हा एकदा भेदक मारा करताना 61 धावांत 5 बळी घेण्याची किमया केली. मिचेल स्टार्कने 2, हॅजलवूड, नॅथन लियॉन व मिचेल मार्शने प्रत्येकी एक गडी बाद केला.

ऑसी संघ 307 धावांनी पिछाडीवर

पाकिस्तानचा पहिला डाव 313 धावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेरीस 1 षटकांत बिनबाद 6 धावा केल्या होत्या. आपली शेवटची कसोटी खेळत असलेला वॉर्नर 6 धावांवर खेळत होता. यजमान संघ अद्याप 307 धावांनी पिछाडीवर असून सामन्याचा आजचा दुसरा दिवस असणार आहे.

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान पहिला डाव 77.1 षटकांत सर्वबाद 313 (शान मसूद 35, बाबर आझम 26, मोहम्मद रिझवान 88, आगा सलमान 53, आमेर जमाल 82, पॅट कमिन्स 61 धावांत 5 बळी, स्टार्क 2 बळी)

ऑस्ट्रेलिया प.डाव 1 षटकांत बिनबाद 6

फेअरवेल कसोटीत वॉर्नरचे जल्लोषी स्वागत

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सिडनेत खेळवला जात आहे. हा सामना ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना आहे. या सामन्यानंतर वॉर्नर पुन्हा कधीही कसोटी जर्सीत दिसणार नाही. सामन्यापूर्वी तो राष्ट्रगीतासाठी मैदानात आला तेव्हा त्याच्यासोबत त्याच्या तीन मुलीही उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित चाहत्यांनी वॉर्नरचे अक्षरश: टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

Advertisement
Tags :

.