अलास्कामध्ये नद्यांचा रंग झाला नारिंगी
बदलाचे कारण अज्ञात, वैज्ञानिकही अवाक्
अलास्काच्या कोबुक व्हॅली नॅशनल पार्कमध्ये नद्या, कालवे आणि अन्य जलस्रोतांचा रंग अचानक बदलून नारिंगी झाला आहे. नारिंगी रंगाच्या नद्यांचे छायाचित्र सायंटिफिक अमेरिकन जर्नलसाठी वाइल्डलाइफ फोटोग्राफर टेलर रोड्स यांनी काढले आहे. कोबुक व्हॅली पार्कमध्ये नजीकचे गाव 95 किलोमीटर अंतरावर आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ अलास्का एंकरेजचे इकोलॉजिस्ट पॅट्रिक सुलिवन यांनी येथे कुठून तरी भयानक प्रदूषण होत असून याचे कारण आम्ही शोधत आहोत असे सांगितले आहे. पॅट्रिक हे स्वत:च्या टीमसोबत नद्यांच्या काठावरून प्रवास करत आहेत. त्यांच्याकडे एक ग्लॉक पिस्तुल आहे, जेणेकरून अस्वलांच्या हल्ल्यापासून स्वत:ला वाचविता येईल.
पॅट्रिक यांनी या नद्यांच्या पाण्याचे पीएच टेस्टिंग केल्यावर त्यांना यात ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी असल्याचे आढळून आले. पीएच लेव्हल 6.4 आहे. हे कुठल्याही सामान्य नदीच्या पाण्यापेक्षा 100 पट अधिक अॅसिडिक झाले आहे. सल्फ्यूरिक अॅसिड तसेच आयर्नचे प्रमाणही अधिक दिसून आले आहे. हे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही. येथील सर्वात मोठी नदी सॅलमन असून याचे शेकडो प्रवाह या खोऱ्यात फैलावलेले आहेत. येथे हजारो शिखरं असून त्यावर बर्फ गोठलेला असतो. या नदीच्या परिसरात मानवी वावर फारच कमी आहे. याचमुळे येथे प्रदूषणाची शक्यता देखील कमी आहे. अशा स्थितीत नदीचा रंग नारिंगी झाल्याने वैज्ञानिकही चकित झाले आहेत.
1980 च्या दशकात येथील पाणी एकदम स्वच्छ असायचे. या नदीचा तळ सहजपणे दिसून यायचा. परंतु सध्या या नदीचा एक तृतीयांश हिस्सा म्हणजे सुमारे 110 किलोमीटर लांबीचा प्रवाह नारिंगी रंगात बदलला आहे. नदीच्या किमान 75 प्रवाहांनी स्वत:चा रंग बदलला आहे. कोबुक व्हॅली नॅशनल पार्कमधील तापमान 2100 पर्यंत 10.2 अंश सेल्सिअसने वाढणार असल्याचा अनुमान आहे. यामुळे येथील पर्माफ्रॉस्टचा 40 टक्के हिस्सा वितळणार आहे. यामुळे लाखो-कोट्यावधी वर्षांपासून गोठलेले जीव आणि रसायनं नद्यांच्या प्रवाहातून बाहेर पडतील. नदीच्या आसपास खनिज अॅसिड रिलिज होत असून यामागे हवामान बदल कारणीभूत असल्याचे मानले जाते. अन्यथा एखाद्या बेडरॉकच्या खालून लोखंडाचा मोठा हिस्सा पाण्याच्या संपर्कात आला असण्याची शक्यता आहे.