कोल्हापुरात फुलली नदीवरची जत्रा
कोल्हापूर :
कोल्हापुरातील पंचगंगा नदीवर सोमवारी रात्री परडी सोडण्याचा पारंपरिक सोहळा उत्साही वातावरणात साजरा झाला. पंचगंगा नदीच्या पाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हा सोहळा साजरा होतो. त्यानिमित्ताने पंचगंगा नदीच्या पात्रात दिवे लावलेल्या परड्या सोडल्या जातात. तसेच पंचगंगेच्या काठावरच मांसाहारी जेवणाचा बेत आखला जातो. जसजशी रात्र वाढत गेली तस तशी या सोहळ्याची रंगत अधिकच वाढतच गेली. सोमवारी सायंकाळी सात वाजल्यापासूनच नदीच्या घाटावर सोयीच्या जागा मिळवण्यासाठी लोकांची रीघ लागली. रात्री नऊ ते दहा च्या सुमारास वाहनांची इतकी गर्दी झाली की लोकांना त्यातून वाट काढणेही अडचणीचे झाले. घाटावर ठिकठिकाणी छोट्या छोट्या गॅसवर लोकांनीच जेवण शिजवले. त्यानंतर एका मागून एक पंगती उठत गेल्या. व पंचगंगा नदीत परडी सोडून हा सोहळा उरकला गेला. त्या निमित्ताने पंचगंगा नदी परड्यांची रांगच लागली. या परड्या वेळेत काढल्या नाहीत तर पंचगंगेच्या पात्रात प्रदूषणात आणखी भर पडेल असेही चित्र आहे. पण महापालिकेने यासाठी विशेष यंत्रणा राबवून पंचगंगा घाटाजवळच्या परड्या उचलण्याचे नियोजन केले आहे.