ऋतूराज आज वनी आला.....6
ज्ञानदेवांनी माणसं जशी सत्वगुणी हवीत तसे त्यांचे कर्मदेखील वसंताप्रमाणे असावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दहाव्या अध्यायामध्ये पुढे ज्ञानदेव लिहितात,
ऐसे विभूधवन वसंते देणे, विरक्तीने एकांते बोलले जेत श्रीमंते , श्रीकृष्ण देखे
असा सत्वगुण वाढीस लागला की मनुष्य विरक्तीला येतो. त्याच्यामधले रज आणि तम गुण नाहीसे होतात. परंतु एक प्रकारची विरक्ती त्याला येते. ज्या विरक्तीत सर्व काही त्यागून माणूस एका विशिष्ट स्थितीला पोहोचतो ती स्थिती वसंताच्या सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळते. ज्याला आपण पानगळ म्हणतो. या पानगळतीमुळे चाफ्याच्या झाडाकडे पाहिल्यावर लक्षात येतं की हा पूर्णविरक्तीला आलेला चाफा शंभू महादेवासाठी म्हणजेच ब्रह्मदर्शनासाठी तिथे उभा राहिला. विरक्तीमध्ये एकांत हवा असतो. अशी एकांतात असणारी अनेक झाडं त्याची पानगळती माणसाला एक प्रकारचे मानसिक शांतता देतात. म्हणूनच या वसंतात जसा विरक्तपणा येतो एकांत हवा असतो. तसाच बहरदेखील इथे पाहायला मिळतो.
पुढे तेराव्या अध्यायात (क्षेत्र-क्षेत्रज्ञ) क्षेत्र म्हणजे देहाबद्दल माहिती देताना आणि या देहाला ओळखणारा क्षेत्रज्ञ सांगताना ज्ञानदेव या वसंताचा आधार घेतात. ‘आता असंगा साक्षी भूत, देही चैतन्याचे जे सतत
तिचे नाव पांडूसुत, चैतन्या ये....
या देहामध्ये जे चैतन्य खेळत असतं, ते चैतन्य नेमकं कसं? तर ह्या वसंताप्रमाणे. अगदी पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत ज्या गोष्टीची सत्ता चालते ती म्हणजे चेतनाशक्ती. ही चेतनाशक्ती आपल्या शरीरामध्ये तीन गुण उत्पन्न करते. सत्व, रज, तम याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो. आपलं मन जर प्रसन्न असेल तर आपल्याला सर्वत्र चैतन्यमय वातावरण दिसतं परंतु आम्ही जर मनाने दु:खी असू, कष्टी असू तर आम्हाला खूप आनंदी वातावरणातसुद्धा दु:खच वाटतं. छान वाटणारा वसंत या दोन्ही गोष्टींची जशी अनुभूती देतो, तीच स्थिती या चैतन्यामुळे आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. म्हणजे चैतन्यामुळेच सृष्टीच्या आधी आमच्या मनामध्ये वसंत फुलत असतो. आपल्या मनाच्या अवस्था, भावना चेहऱ्यावर जशा उमटतात तशा शरीरावरसुद्धा जाणवतात. वसंत ऋतूचे देखील असंच. वसंताचे चैतन्य ज्या ज्या झाडांना मिळतं तिथे सुंदर देखणी पालवी पल्लवीत झालेली दिसते. परंतु काही झाडांना मात्र हे चैतन्य पेलवतच नाही. त्यांची पानगळ डोळ्यातल्या अश्रूप्रमाणे टपकतच असते. असा हा वसंत ऋतू तुमच्या आमच्यामध्ये आपपर भाव काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. हा ऋतू आल्यानंतर सर्व जीवसृष्टीला, चराचराला चैतन्य देत राहतो. तसंच माणसाचंदेखील असलं पाहिजे. परंतु आम्ही प्रत्येक गोष्टीला सुखं आणि दु:खाच्या कप्प्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि इथेच चुकतो. यासाठी तेराव्या अध्यायात ज्ञानदेव लिहितात
आपुला प्रभाव करी, जै इंद्रियाचीये व्यापारी
डोळाही दिसे ..., पै वसंताचे रिगवणे
झाडाचे नि ज्ञातेपणे, जाणिजे तेवि कारणे
सांगती ज्ञाती .... अशा वृक्षाची पातळी
जे शाखांच्या बहाळी, बाहेर दिसे....
अशी माणसं आम्हाला जागोजागी दिसतात. माणूसच ज्ञानी असेल तर त्याच्या चालण्या, बोलण्यावरून त्याची बुद्धिमत्ता, त्याच्यातले चैतन्य प्रकट होत असते. तसेच वसंतातदेखील ज्या झाडांची कुवत असते ती झाडं वसंताच्या चैतन्याने फुलून येतात. पानं झडली तरी आनंदाने बेहोष होतात. तसंच माणसाचेदेखील असतं. आनंददेखील पेलता यायला लागतो. बरीच माणसं आनंदाने कोलमडून पडतात. किंवा दुसऱ्याचा आनंद बघून कष्टीदेखील होतात. पण खरा आनंद झालेला माणूस हृदयापासून चैतन्याने फुलून येतो आणि सर्वत्र आनंदाचेच वातावरण निर्माण करतो. नेमकी हीच गोष्ट वसंत ऋतूत आम्हाला शिकायला मिळते. ज्ञानदेव म्हणूनच सतत या वसंताचीच उपमा सर्वत्र देताना दिसतात.