For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

ऋतूराज आज वनी आला....2

06:24 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऋतूराज आज वनी आला    2

गीतेमध्ये श्रीकृष्ण जसं स्वत:ला मार्गशीर्षाचा अधिपती म्हणवतो तसंच ऋतूमध्ये वसंताचा अधिपती तोच असतो. गोकुळ म्हणजे शरीर आणि त्यातल्या 16108 वाहिन्या म्हणजे आपल्या नीला आणि रोहिणी. ज्यांच्यामुळे इंद्रिय गम्य सुखाचे आपण अधिपती होतो. वसंत ऋतूचा आस्वाद घेऊ शकतो. जो आस्वाद रूप, रस, गंध, स्पर्श, ध्वनी यातून आपल्याला मिळतो. ते सर्व इंद्रिय अवयव या वाहिन्यांचे आधीन असतात. प्रत्येक ऋतूंचं जसं बहरणं, दिसणं वेगळं तसंच प्रत्येक ऋतूचा गंधसुद्धा किंबहुना वेगळा. श्रावणाचा हिरवा गंध जसा ओलसर, तसा गंध उन्हाळ्याचा माती भाजल्याचा वास या पावसामुळे आपल्याला कळतो. उन्हाचा वास मात्र मोगरा घेऊन येतो. स्त्राrच्या मनाची घालमेल, तिने केलेला श्रृंगार आणि हळुवार क्षणांचा साक्षी म्हणून मोगऱ्याला पसंती मिळते. त्याचं या वसंताच्या वाटेवरचं गंधाळलेपण वसंतालाच सुगंधी साज चढवतं. चाफ्याप्रमाणेच सप्तरंगी इंद्रधनुच्या छटा स्वत:मध्ये लपवून, साऱ्यांना एकजीव करून पांढरेपणात सजणारा मोगरा वाऱ्याबरोबर आपल्या श्वासातसुद्धा भरून राहतो. आपलेपणाच्या जाणिवा तो नकळत पेरत असतो. त्याच्या छटा तरी किती...मन शांत करणारा मोगरा, प्रीतीची धुंदी देणारा मोगरा, भक्तिरसात चिंब भिजवणारा, परब्रम्हाची भेट घडवणारा मोगरा, भक्तीचा वेलू आकाशापर्यंत पोहोचवणारा मोगरा, विलासी लोकांच्या मनगटावर सजणारा मोगरा, दर्ग्यावर चादर बनून मन शांत करणारा मोगरा, वैराग्यअवस्थेत मनभर पसरणारा मोगरा, म्हणजे राजवैभवाचे प्रतीक म्हणूनच ज्ञानदेवांच्या भक्तीचा प्रतीक असलेला मोगरा थेट आभाळाला गेल्यावर मोगऱ्याच्या रूपात न संपणारा बहर या मोगऱ्याला येतो. अमृताचा शिडकावा अष्टगंधित करतो. असा मोगरा ज्या वसंतात फुलतो तो ऋतू गंधयुक्त ठरतोच आणि पानगळतीसुद्धा एखाद्या झाडाचं अनुष्ठान सुरू असावं, असाच आपल्याला भास होतो. पृथ्वीला शिवपिंड मानून आपल्या पानाचे लक्ष वाहणारा निसर्ग या ऋतूत ध्यानस्थ ऋषीमुनींसारखा वाटतो. या पानगळतीच्या यज्ञातून नवचैतन्याची पालवी तिचं वरदान लगेचच निसर्गाच्या ओंजळीत टाकणारी शक्ती या वसंतात आपल्याला जाणवते. म्हणून तर हा चैतन्याचा, वैभवाचा ऋतू ठरतो. झाडांवरचे कोंब उसवण्याचा सुंदर करिष्मा निसर्गात सुरू असतो. आतल्या गाठीची माणसं अगदी मरायला टेकली तरी मनातलं काही सांगत नाहीत आणि ते सगळं आपल्या मनात आपल्याबरोबरच ते घेऊन जातात. निसर्ग मात्र दिलखुलासपणे या सगळ्या गाठी उसवतो. आपल्या ओंजळी मोकळ्या करतो. पानगळतीचे थर मातीत विरघळवतो. एकाचवेळी जन्म आणि मृत्यूच्या छटा मिरवतो. हा वसंत आपल्या अवतीभवती वावरत असतो. एखाद्या रागदारीतील विविध छटांचे पदर उलगडणारा गायक जितक्या सहजतेने ‘ मेडले’ सादर करतो ना तसा हा वसंत या सगळ्या ऋतूंच्या छटा सहज जाणवून देतो. एखादा गंध आपल्याला असा काही भिजवतो की क्षणभर वर्षा ऋतूची आठवण येते. रखरखीत मैदानं, फांद्या, पानगळ, उन्हाची काहीली अशी काही दाखवतो की सावलीसाठी जीव आपला आसू असतो आणि सकाळची थंडी अशी काही शहरते की फुलांची दवबिंदूची अनुभूती मात्र येत असते. अशी अनुभूती देणारा ऋतू म्हणजे वसंत.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.