For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऋतूराज आज वनी आला...1

06:33 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऋतूराज आज वनी आला   1
Advertisement

एखाद्या राजाची पालखी येणार असेल तर त्या गावांमध्ये किंवा राज्यामध्ये जेवढी जय्यत तयारी सुरू होते. तशीच तयारी निसर्गातल्या या वसंताच्या पालखीच्या आगमनाची सुरू होते. पलाशाची फुलं अति उंचावर जाऊन भगव्या ध्वजाची उभारणी करतात, तर गुलमोहरच्या पायघड्यांनी या वैभवशाली राजाला रेड कार्पेट घातले जाते. तोरण बांधण्याचं काम बहाव्याची फुले चोख बजावतात. सगळीकडे केव्हाच या सोहळ्याची तयारी सुरू झालेली असते. उघड्या बोडक्या झाडांवर कोवळी तपकिरी हिरवी पानं हळूहळू हिरवाईचा साज चढवायला सुरुवात करतात. कारण या आधी पानझडीच्या ऋतूमध्ये हे सर्व सौंदर्याचे साज प्रत्येक झाडाने जणू उतरून ठेवलेले असतात. या सगळ्यांमध्ये चाफ्याचा मात्र वेगळाच नूर दिसून येतो. त्याला इतकी वैराग्यवस्था आलेली असते किंवा ती इतकी शिगेला पोहोचलेली असते की पांढऱ्या फुलांच्या ओंजळी भरून त्या परब्रह्माशी एकरूप व्हायला तो निघालेला असतो. साऱ्या चराचराचे रंग लेवून विरक्ती आलेला पांढरा रंग लेऊन सांगत असतो ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ निष्पर्ण अवस्थेतसुद्धा उत्कटतेने बहराला येणारा, भरभरून फुलणारा चाफा वसंतातच जास्त शोभतो. वसंताचे रंग भडक पण आकर्षकही असतात. अगदी उन्हात भाजून गर्द केलेल्या सारखे याची साक्ष द्यायला बोगन वेली रसरसुन फुललेल्या दिसतात, त्या याच ऋतूमध्ये. आपल्याला जणू सांगत असतात, उन्हाळ्यातसुद्धा बहरून यायचं असतं. कोणतीच अवस्था, ऋतू, परिस्थिती कायम नसतेच म्हणून ते ते क्षण सोसून, भोगून संपवायचे असतात. कारण असा क्षण नेमका केव्हा आणि कसा येईल सांगता येत नाही. फाल्गुन सावलीसाठी येणारा महिना. रितेपणासुद्धा आठवणींच्या साक्षीने सुंदर करता येतो हेच सांगत असतो. हा महिना वैराण, रानावनात, अन् आयुष्यातसुद्धा भगव्या पळसाच्या ध्वजा उभारून आनंदात जगता येतं हे सांगतो. पानगळ होताना झाडाची हाडं-काडं दिसायला लागल्यावर उगीचच मनाला रुख रुख वाटायला लागते. आपण नकळत त्या निसर्गाशी कुठेतरी स्वत:ची तुलना करत बसलेले असतो. आणि लक्षात येतं या सगळ्या पानांनी आपापल्या आयुष्याची, कर्माची परिपूर्ती केली आहे. आता त्याला पाचोळा कसं काय म्हणायचं? उलट विरक्त अवस्थेत सर्व पाश संपवून पुन्हा रुजण्यासाठी निघालेल्या पानांचा महोत्सवच इथे पाहायला मिळतो. नवागतांना म्हणजेच कोंबांना जागा करून निर्मितीचे डोहाळे लावणारा महिना म्हणून त्याचं कौतुक करायला वसंत ऋतू आलेला असतो. आपल्या निर्मितीतून म्हणजेच मातीत जाऊन खऱ्या अर्थाने धुलीवंदन करणारा निसर्ग कृतज्ञतेने त्याच्या बहराने खुललेला असतो. जणू पाचोळ्याचे पैंजण वाजवत तो मिरवत असतो. आयुष्याच्या टळटळीत उन्हातसुद्धा स्वत:ला उदास होऊ द्यायचं नसतं. पानांनी हात सोडले तरी, आपली वेळ आली की थांबायचं असतं, याचं सुरेख उदाहरण म्हणजे हा ऋतुराज वसंत.

Advertisement

Advertisement
Tags :

.