अग्निशामक जवानांना जोखीम भत्ता
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : राष्ट्रीय अग्निशामक सेवा दिन साजरा
पणजी : अग्निशामक दलाच्या जवानांना आणि अधिकाऱ्यांना अग्नि जोखीम भत्ता देण्याच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावावर सरकार विचार करत असून तो लवकरच देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. या आर्थिक वर्षापासून अग्निशामक दलाला अग्नि जोखीम भत्ता देण्याची दीर्घकाळापासूनची मागणी गोवा सरकार पूर्ण करील, असेही त्यांनी सांगितले. काल सोमवार दि. 14 एप्रिल रोजी अग्निशामक दलाच्या प्रशिक्षण मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अग्निशामक सेवा दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
गोवा देशातील पहिले राज्य
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राच्या आर्थिक मदतीने 11 बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा बांधणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. या 11 चक्रीवादळ निवारा इमारतीसाठी केंद्र सरकारने 340 कोटी ऊपयांची मदत केली आहे. तसेच, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि पोलिसांकडून सध्या 40 सुसज्ज शमन केंद्रे तात्पुरत्या आधारावर वापरली जात आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून दलाचे कौतुक
आग आणि इतर आपत्कालीन परिस्थितींना प्रतिसाद देण्यासाठी अग्निशामक दलाच्या 24 तास सेवेचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षी 44 कोटी ऊपयांची मालमत्ता वाचवली आहे. या काळात आगीशी संबंधित आणि इतर अपघातांमध्ये 398 मानवी जीव वाचविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक घटकांना आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवून अग्निसुरक्षा प्रमाणपत्रे मिळविण्याचे आवाहन केले आहे. राज्यभरात आपत्कालीन मदतीसाठी स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या 350 आपदा मित्र आणि आपदा सखींना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमाच्या सुऊवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दलाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर परेड करून मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर यांनी स्वागतपर भाषण करताना अग्निशामक दलात वर्षभर राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलातील ज्या जवानांनी सेवा बजावताना आपले प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद गावस व रवी नाईक यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
अनेक प्रात्यक्षिके सादर
यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीला कसे सामोरे जातात, आग आटोक्यात कशी आणतात,तसेच आग लागलेल्या इमारतीत अडकलेल्या लोकांना कसे वाचविले जाते, याची प्रात्यक्षिके करून दाखविली. अग्निशामक दलातील विविध अत्याधुनिक यंत्रे तसेच अन्य साहित्याच्या प्रदर्शनाची मान्यवरांनी पहाणी केली.
चित्रकला स्पर्धेचा निकाल
अग्निशामक दलाने दोन गटात चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. त्यात पहिल्या गटात सारा किशोर बांदेकर (सर्वोदया शिक्षण संस्था हायस्कूल, कुडचडे), जीवया जिवन नार्वेकर (फातिमा कॉन्व्हेंट, मडगाव), तेजस्वी एस. नाईक (सर्वोदया शिक्षण संस्था हायस्कूल कुडचडे) यांना अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे बक्षीस देण्यात आले. दुसऱ्या गटात कविश वी. देविदास (सर्वोदया शिक्षण संस्था हायस्कूल कुडचडे), आयुष दळवी (जीव्हीएमएस उत्कर्ष विद्यामंदिर फोंडा) व तानी प्रविण चारी (शांतादुर्गा हायस्कूल डिचोली) यांना अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे बक्षीस देण्यात आले.
उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा गौरव
अग्निशामक दलातील उत्कृष्ट सेवा बजावलेल्या जवानांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक प्रदान करून सन्मानीत करण्यात आले. त्यात सुशिल मोरजकर (फायर अधिकारी फोंडा केंद्र), सखाराम पेडणेकर (सहाय्यक अधिकारी पणजी मुख्यालय), अर्जुन के. धाऊस्कर (लिडींग फायर फायटर डिचोली केंद्र), उमेश नेमळेकर (लिडिंग फायर फायटर पणजी केंद्र), महादेव गावडे (वाहनचालक वाळपई केंद्र), ऊपेश सतरकर (फायर फायटर मडगाव केंद्र), दिलीप सावंत (फायर फायटर म्हापसा केंद्र), जयराम मळीक (फायर अधिकारी पेडणे केंद्र), भिवा गवस (फायर फायटर ओल्ड गोवा केंद्र), अनिकेत आमोणकर (फायर फायटर फोंडा केंद्र), साईराज नाईक (फायर फायटर म्हापसा केंद्र), शैलेश गावडे (एफपी विभाग स्टेशन अधिकारी), रवी नाईक (स्टेशन अधिकारी प्रशिक्षण विभाग), सुदेश बोरकर (लिडिंग फायर फायटर मडगाव केंद्र), सलिम शेख (लिडिंग फायर फायटर पर्वरी केंद्र), दामोदर पेडणेकर (लिडिंग फायर फायटर एमटी विभाग), सय्यद अमझद (लिडिंग फायर फायटर एफपी विभाग), संतोष कळंगुटकर (वाहनचालक पणजी केंद्र), सत्यवान गवस (फायर फायटर प्रशिक्षण विभाग), नवजीत मळीक (फायर फायटर फोंडा केंद्र), लक्ष्मण मळीक (फायर फायटर एफपी विभाग), अनिल तलवार (फायर फायटर मुख्यालय), लक्ष्मण सावंत (हेड क्लार्क मडगाव विभाग केंद्र), संतोष गोवेकर (मुख्यालय कर्मचारी) यांचा समावेश आहे.