वाढता पारा, प्रचाराचा मारा, मतात घसारा
निवडणुकीचे पहिले दोन टप्पे पार पडले असले तरी मतदानाची आकडेवारी मात्र उत्साहवर्धक नाही. त्याचा फायदा कोणाला होणार हे ठरवणे हे मुश्किल. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यापासून कडक उन्हाला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. 41 पासून 45 अंशापर्यंत चढत जाणारा पारा आणि त्यावर प्रचाराचा मारा यात गोंधळलेला महाराष्ट्र मतदान केंद्रावर कितपत पोहोचणार हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. या गोंधळात कोणाची लॉटरी लागून जाईल सांगता येणे मुश्किल.
राज्यातील पहिल्या दोन टप्प्यांच्या मतदानाबद्दल जशी अपेक्षा व्यक्त केली जात होती तसे काही झालेले दिसले नाही. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या ज्या भागात हे मतदान झाले तिथला सभांचा आणि प्रचाराचा उत्साह मोठा होता. मात्र त्या प्रमाणात मतदार उत्साहाने बाहेर पडल्याचे मात्र दिसून आले नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये ज्या उत्साहाने लोक मतदानाला बाहेर पडले होते तो उत्साह यावेळी का दिसून आला नाही? हा खरे तर अभ्यासाचा विषय ठरावा. प्रत्येक राजकीय पक्षाने आपले केडर वाढवण्याचा गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला आहे. भाजपच्या पन्ना प्रमुख व्यवस्थेला तोडीस तोड व्यवस्था उभी करू शकतो का? याचा प्रयत्न प्रत्येकाने करून पाहिला आहे. मात्र ही व्यवस्था करताना काय खर्च होतो हे लक्षात घेऊन अनेकांनी त्यात पर्यायी मार्ग स्वीकारल्याचे देखील दिसून आले. वैशिष्ट्या म्हणजे लोकांची कमतरता पडू लागल्याने अशा कामासाठी उतरणाऱ्यांचा भावसुद्धा या निवडणुकीत वधारलेला दिसला. परिणामी कार्यकर्ता या संकल्पनेला आता ‘पेड व्हॉलिंटिअर्स’ असे काहीतरी विचित्र स्वरूप प्राप्त होऊ लागल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या प्रचार सभा आणि रॅलीमध्ये नेत्यांच्या आकर्षणापोटी लोकांनी सहभागी होण्याचे दिवस आता मावळत चालले आहेत. लोक आजही उत्सुकतेने यामध्ये सहभागी होतात. मात्र आपल्याला प्रचंड प्रतिसाद आहे हे दाखवण्याच्या नादात स्थानिक राजकीय नेत्यांच्या सुरू झालेल्या स्पर्धांमुळे आधीच अशा गर्दीचा उच्चांक करण्याचा खर्च वाढत चालला आहे. या परिस्थितीने कार्यकर्त्यांची चलबिचल झाली नसती तरच नवल. परिणामी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आता पक्षाकडून मोठ्या अपेक्षा करू लागले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर चुकीचा आणि खोटा प्रचार घरोघरी फिरून केला जात असल्याचे सुद्धा दिसून येत आहे. यामध्ये महिला वर्गाला गाठून काही महिला व्हॉलिंटिअर्स आपापल्या उमेदवाराचा प्रचार करताना ‘बँकेत खाती खोला, तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत’ अशा प्रकारच्या अफवासुद्धा उठवताना दिसत आहेत. असे प्रकार रेकॉर्डवर आले नसल्याने आणि कोणत्याही राजकीय पक्षाकडून किंवा कार्यकर्त्यांकडून याबाबत पोलिसांपर्यंत जाऊन तक्रार दाखल झाली नसल्यामुळे हा प्रकार महाराष्ट्रभर ग्रामीण भागात सर्रास सुरू झाला आहे. याबाबत पोलखोल करायची तर कार्यकर्ते हाडाचे हवेत. मात्र सर्वच राजकीय पक्षात अशा कार्यकर्त्यांची आता वानवा जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात शेवटच्या घटकापर्यंत नेमके काय सुरू आहे, कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे आणि कशा प्रकारची खोटी आश्वासने प्रत्येक व्यक्तीला दिली जात आहेत याची माहिती संकलित होणे अवघड आहे. ही माहिती मिळेपर्यंत प्रचार करून संबंधित लोक निघून गेलेले असतात आणि त्याबाबत कोणताही खुलासा केला जात नाही. स्थानिक कार्यकर्त्यांना याबाबत फारशी माहिती नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे लोक ज्याने आपल्याला निरोप पोहोचवला त्याची प्रतीक्षा करत राहतात. घटती आकडेवारी आणि निराशा या मागचे हे कारण आहे का याचा शोध घेतला पाहिजे. मात्र हा शोध घेणे ना सरकारी कार्यक्रमाचा भाग आहे ना कार्यकर्त्यांचा.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण या पट्ट्यात येत्या आठवड्यात प्रचाराने जोर घेतलेला दिसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सगळ्याच पक्षांचे दिग्गज नेते या भागात उतरत आहेत. निवडणुकीचा आतापर्यंत तुझा रागरंग पाहिला तर ही लढाई आता तीव्र होऊ लागली असून एकमेकांवरील तीव्र हल्ले या भागात लोकांना अनुभवायला येतील. यापूर्वी उत्तर भारतात आणि विदर्भात झालेले राजकीय हल्ले आणि बदलत्या मतदानाच्या आकडेवारीमुळे बदललेल्या भूमिकांवर कठोरपणे बोलणारे नेते लोकांना अनुभवायला येतील. त्याची सुरुवात राहुल गांधी यांनी सोलापूरमधून करून दिली आहे. कोल्हापूर, पुणे, बारामती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा, माढा, शिरुर, मावळ हे धगधगते मतदार संघ आहेत. या मतदारसंघांमध्ये होणाऱ्या सभा आणि त्यांचा संपूर्ण प्रदेशावर होणारा परिणाम ज्या काळात होणार आहे, तो काळसुद्धा तापमान वाढीचा आहे. उद्यापासूनच अनेक ठिकाणचे तापमान 41 अंशापासून वाढत जाऊन पुढच्या आठवड्यापर्यंत 45 वर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यातच नेत्यांचीसुद्धा कडक भाषणे लोकांना ऐकायला मिळतील. मोदी यांचा नव्या भारताचे स्वप्न दाखवणारा अजेंडा, राहुल गांधी यांचा युवकांना नोकऱ्या आणि शेतकरी, महिला यांच्या बाबतीत प्रत्यक्ष खात्यावर लाभ पोहोचवणारा अजेंडा, अजित पवार यांचा जातनिहाय जनगणनेचा अजेंडा, पवार आणि ठाकरे यांचा काँग्रेसशी मिळताजुळता अजेंडा यावर खरोखरच या सभांमध्ये मुख्य नेते चर्चा करतील किंवा नाही याबद्दल आता तरी शंकाच आहे. प्रत्यक्षात एकमेकांवर कठोर टीका करण्यास हे नेते प्राधान्य देत असल्याने मुद्यांवर चर्चा कितपत होईल याबाबत साशंकता आहे.
2012 नंतर आंदोलनांपासून निवडणुकांपर्यंत सगळीकडेच अत्यंत खालच्या पातळीवरील टीका आणि वक्तव्ये वाढत चालली आहेत आणि ती मतदारांना पसंत आहेत अशातला भाग नाही. मात्र तरीही नेते आपली ही सवय सोडायला तयार नाहीत. उलट अधिकाधिक अभद्र भाषा वापरण्यावर त्यांचा भर वाढला आहे. अशा स्थितीत लोकांच्या वर काय परिणाम होतो याचा विचार होत नाही मात्र मतदानाची टक्केवारी घटली याचाच तेवढा विचार होतो. हवामानाचे बदल आणि राजकीय संस्कृतीतील बदल याचा परिणाम काय होतो आहे, याबद्दल या निवडणुकीच्या निकालानंतर तरी विचार होणार का हा खरा प्रश्न आहे. घटत्या मतदानाचा परिणाम नेमका कसा होतो आणि कोणाला त्याचा लाभ मिळतो हे 4 जून रोजी निकालादिवशीच कळणार आहे.
शिवराज काटकर