वाढत्या उष्णतेचा कोंबड्यांना धोका
मृत्यूच्या प्रमाणात वाढ : कोंबड्या वाचविण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांची धडपड
बेळगाव : वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्याच्या मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे. विशेषत: पोल्ट्री व्यावसायिकांना फटका बसू लागला आहे. पारा 40 अंशाच्या पुढे गेल्याने कोंबड्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोंबड्यांना वाचविण्यासाठी पोल्ट्री चालकांची धडपड सुरू आहे. काही ठिकाणी शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे मोठा आर्थिक फटकाही बसला आहे. अलीकडे कुक्कुटपालन करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे गावोगावी पोल्ट्री फार्म दिसून येतात. मात्र वाढत्या उष्म्यामुळे पोल्ट्रीतील कोंबड्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ लागला आहे. दरम्यान कोंबड्यांना वाचविण्यासाठी वातावरण थंड करणे किंवा छतावर गवत टाकून स्प्रिंक्लरद्वारे पाणी सोडणे अशी धडपड पोल्ट्री चालकांची सुरू आहे. विशेषत: कोंबड्यांच्या पिल्लांच्या मरतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोंबडी व्यावसायिकांना चिंता लागली आहे.
जिल्ह्यात 2 लाखाहून अधिक पोल्ट्री व्यावसायिक
जिल्ह्यात 2 लाखाहून अधिक पोल्ट्री व्यावसायिक आहेत. प्रत्येक पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांची संख्याही शेकडोहून अधिक आहे. मात्र, यंदा उष्णतेच्या प्रमाणात उच्चांकी वाढ झाली आहे. वाढता उष्मा सहन होत नसल्याने कोंबड्या मृत्युमुखी पडू लागल्या आहेत. पोल्ट्री चालकांनी पोल्ट्रीचे बांधकाम कोंबडी खाद्य, वीजपुरवठा, पाणी, आणि वैद्यकीय खर्चासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. मात्र, वाढत्या उष्म्याने कोंबडीची पिल्लेच मरत असल्याने व्यवसाय अडचणीत येऊ लागला आहे.
नवीन कोंबडी तयार होण्याच्या प्रमाणात घट
पोल्ट्रीतून नवीन कोंबडी तयार होण्याचे प्रमाण घटल्याने चिकनच्या किमतीतही वाढ होऊ लागली आहे. मध्यंतरी चिकन प्रति किलो 280 रुपयापर्यंत गेला होता. चिकनला समाधानकारक दर असला तरी कोंबड्यांच्या संरक्षणासाठीच दुप्पट पैसा खर्च करावा लागत असल्याची खंत व्यावसायिकांनी क्यक्त केली आहे.
कमी खाद्य देण्याची गरज
उन्हाळ्यात काही उपाययोजना करून कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करता येते. पाणी गरम देऊ नये, छतावर वारंवार पाणी शिंपडून छत थंड करावे, सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत कमी खाद्य द्यावे.
डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन खाते)