Kolhapur Breaking : 31 डिसेंबरच्या दाजीपूर येथील ऋषिकेश होम स्टेवर जुगार खेळणाऱ्यावर छापा; 12 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त
सिंधुदुर्गातील अनेक जणांवर गुन्हा दाखल, राधानगरी पोलिसांची कारवाई, 12 लाख 97 हजाराचा मुद्देमाल जप्त; जुगारात सहभागी असणारे काहीजण पळाल्याची चर्चा
राधानगरी/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यासाठी प्रसिध्द असलेल्या दाजीपूर अभयरण्यात दाजीपूर (ओळवन )येथील ऋषिकेश स्टे होम मध्ये जुगार सुरू असल्याची गोपनीय खबर मिळाल्यानुसार राधानगरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 12 लाख 97 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात भाडेतत्वाने चालवीत असणाऱ्या स्टे होमच्या मालका सह 6 जणांवर जुगार कायदा कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली. ही कारवाई काल 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास दाजीपूर अभयारण्याच्या नजीक असलेल्या ओलवन गावच्या हद्दीमध्ये केली.
या कारवाईमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 72 हजार रुपये रोख,25 हजार किंमतीचे दोन मोबाईल, 12 लाखाची क्रेटा कार, असा मिळून 12 लाख 97 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली.
या कारवाई मध्ये किशोर वासुदेव सामंत (34, फोंडाघाट बोकलभाटले), प्रदीप अर्जुन पाटील (49, माठेवाडा, सावंतवाडी), प्रकाश दत्तात्रय साळवी (38, फोंडाघाट बाजारपेठ), आनंद चनाप्पा मेट्टी (38, कुडाळ), बाळू अशोक बाणे (32 फोंडाघाट झर्येवाडी), मिलिंद श्रीधर कुबडे ( 45 फोंडाघाट), व स्टे होमचा मालक सागर अनंत खंदारे (राधानगरी ओलवण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थर्टी फर्स्ट च्या निमित्ताने काहीजण या स्टे होम जवळ रमी नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. अचानक पोलिसांनी ही कारवाई केल्याने एकच पळापळ झाली. यात काही जण चर्चेत असणारे चेहरे पळण्यात यशस्वी झाल्याची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे. राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर, दिगंबर बसरकर व कृष्णात यादव,यांच्यासह अन्य पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.