‘गोल्डमन सॅक्स’मध्ये ऋषी सुनक सल्लागार
वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक आता प्रसिद्ध गुंतवणूक बँक ‘गोल्डमन सॅक्स’ ग्रुपमध्ये सामील झाले आहेत. त्यांना कंपनीत वरिष्ठ सल्लागारपद मिळाले आहे. गोल्डमन सॅक्सचे सीईओ डेव्हिड सोलोमन यांनी स्वत: यासंबंधी घोषणा केली आहे. ऋषी सुनक आता कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनात सामील होऊन जागतिक स्तरावरील ग्राहकांना सल्ला देतील. ते विशेषत: भू-राजकीय आणि आर्थिक विषयांवर आपले विचार आणि अनुभव शेअर करतील, असे डेव्हिड सोलोमन यांनी सांगितले.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक सध्या खासदार म्हणूनही काम करत आहेत. त्यासोबतच ते आता ‘गोल्डमन सॅक्स’मध्ये सल्लागार म्हणूनही सामील झाले आहेत. जुलै 2024 मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा देणारे सुनक जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवरील त्यांचे विचार बँकेच्या ग्राहकांना सल्ला देण्यासाठी अर्धवेळ काम करतील. राजकीय कारकिर्द सुरू करण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला एका बँकेत विश्लेषक म्हणून काम केले होते. 2015 मध्ये त्यांनी संसद सदस्य म्हणून ब्रिटनच्या राजकारणात प्रवेश केला. तसेच ते ऑक्टोबर 2022 ते जुलै 2024 पर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान राहिले आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी ते फेब्रुवारी 2020 ते जुलै 2022 पर्यंत ब्रिटनचे अर्थमंत्री देखील राहिले आहेत. याशिवाय त्यांनी स्थानिक सरकार आणि अर्थ मंत्रालयातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.