For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिशान लेंगडे याची राष्ट्रीय कॉन्टेस्टमध्ये चमकदार कामगिरी

06:25 AM Nov 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
रिशान लेंगडे याची राष्ट्रीय कॉन्टेस्टमध्ये चमकदार कामगिरी
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बेळगावचा विद्यार्थी रिशान शशांक लेंगडे याने ‘राष्ट्रीय मार्क रोबर जुगाड कॉन्टेस्ट’मध्ये चमकदार कामगिरी बजावत 5 लाखांचे पारितोषिक पटकावले आहे. त्याने साध्या स्केचपेनमधून स्टायलस (टच स्क्रीनवर लिहिण्यासाठी किंवा चित्र काढण्यासाठी वापरली जाणारी लेखणी) हे उपकरण तयार केले आहे. त्याच्या या अभिनव कल्पनेमुळे मार्क रोबर जुगाड कॉन्टेस्टमध्ये देशातील दहा अव्वल विजेत्यांपैकी एक विजेता म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचा उद्देश दैनंदिन वापरातील वस्तूंमधून नाविन्यपूर्ण उपाय शोधणे म्हणजेच भारताच्या जुगाड परंपरेला सलाम करणे हा असून रोबर यांनी यापूर्वी नासामध्ये क्युरिऑसिटी मार्स रोव्हर प्रकल्पावर अभियंता म्हणून काम केले आहे. अॅपलमध्ये स्वयंचलित वाहनांसाठी व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञानावर त्यांनी काम केले असून मनोरंजनाच्या अंगाने विज्ञान शिकविण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.

रिशानने तयार केलेला स्टायलस परीक्षकांच्या पसंतीस उतरला. महागड्या उपकरणांशिवाय शोधक नजर, कल्पनाशक्ती व प्रयोगशील वृत्ती असली तरी नवकल्पना शक्य असते, हे त्याच्या डिझाईनने परीक्षकांसमोर सिद्ध केले आहे. पारितोषिकाची रक्कम रिशानच्या खात्यात जमा झाली असून या स्पर्धेत तो सहभागी झाला आहे, याची कल्पना त्याचे पालक शशांक प्रेमचंद लेंगडे व शिल्पा लेंगडे यांना विजयाचा ई-मेल येईपर्यंत नव्हती. रिशानच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.