कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
कसबे डिग्रज व मौजे डिग्रजमधील ग्रामस्थांना स्थलांतराचे आवाहन
कसबे डिग्रज :
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मिरज प्रांताधिकारी आणि सांगली अप्पर तहसीलदार यांनी कसबे डिग्रज व मौजे डिग्रज गावांना भेट दिली. या दरम्यान, पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या गेल्या.
धरण क्षेत्रातील जोरदार पाऊस, कोयना धरणातून होणारा सततचा विसर्ग आणि कृष्णा नदीच्या पाण्यात होत असलेली वाढ लक्षात घेता, पूरप्रवण भागातील ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
स्थलांतरित ग्रामस्थांसाठी गावातील शाळा व महाविद्यालयांमध्ये तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात आली आहे. कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रज या दोन गावांना जोडणारा जुन्या बंधाऱ्यावर आधीच पाणी आल्याने तो वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तसेच, नवीन पूल देखील दुपारपर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत पूरप्रवण भागातील नागरिकांना सतत सूचना दिल्या जात असून, कोणतीही आपत्ती टाळण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.