भरतीसाठी आलेल्या तरुणांकडून शहरात हुल्लडबाजी
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रादेशिक सेनेच्या भरतीसाठी विविध राज्यातील तरुण बेळगावमध्ये आले आहेत. परंतु या तरुणांकडून सुरु असलेल्या हुल्लडबाजींमुळे स्थानिकांसह रेल्वे प्रवाशांनाही मन:स्ताप सहन करावा लागत आहे. जोरजोरात घोषणा देणे, जागा मिळेल तेथे आसरा घेणे असे प्रकार सुरु असल्यामुळे शहरातील नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
बेळगावमधील प्रादेशिक सेनेच्या मुख्यालयाच्यावतीने 4 ते 12 नोव्हेंबर दरम्यान बेळगावमध्ये भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये तेलंगणा, गुजरात, गोवा, दादर, नगर, हवेली, पाँडिचेरी, दीव, दमन, लक्षद्वीप, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांमधील तरुण टप्प्याटप्प्याने सहभागी होणार आहेत. मागील दोन ते चार दिवसापासून राजस्थान येथील तरुण हजारोंच्या संख्येने दाखल झाले होते. दोन दिवस आधीच हे तरुण शहरात दाखल झाल्याने मोठी गर्दी झाली.
बेळगाव रेल्वे स्थानक, कॅन्टोन्मेंट बस स्थानक, कॅम्प परिसरातील खुल्या जागांवर त्यांनी आसरा घेतला. शुक्रवारी काही तरुणांनी रेल्वे स्थानकावर हुल्लडबाजी केली. ज्या ठिकाणी चरख्याची प्रतिमा बसविण्यात आली आहे. तेथेही आसरा घेतल्याने रेल्वे पोलिसांनी आक्षेप घेतला. त्यामुळे तरुण व पोलिसांमध्ये वादावादी होऊन घोषणाबाजी करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी रेल्वे स्थानकावर पाय ठेवण्यासही जागा उपलब्ध नव्हती. यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना गर्दीचा अहवाल हुबळी येथील मुख्य कार्यालयाला पाठवावा लागला.
रेल्वेचे बुकिंग फुल्ल
भरतीमुळे उत्तर भारतातून बेळगावकडे येणाऱ्या सर्व एक्स्प्रेस फुल्ल होऊन येत आहेत. विशेषत: जनरल बोगीमध्ये पाय ठेवण्यासही जागा उपलब्ध होत नसल्याचे चित्र दिसत आहे. भरती झाल्याबरोबर रात्रीच्या रेल्वेने हे तरुण माघारी फिरत आहेत. त्यामुळे हुबळी-दादर, पुदुच्चेरी-दादर, वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस, पूर्ण क्षमतेने भरून जात आहे.