बरेलीत पाडविली दंगलखोरांची घरे
उत्तर प्रदेश सरकारकडून आणखी कारवाई होणार
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तर प्रदेशातील बरेली शहरात काही दिवसांपासून धार्मिक तणावाचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात या शहरात धार्मिक दंगलीला तोंड फुटले होते. हत्या, जाळपोळ आणि दगडफेकीचे अनेक प्रकार घडले होते. आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारने या शहरात धडक कारवाई केली असून दंगलखोरांच्या घरांवर बुलडोझर कारवाईला प्रारंभ केला आहे. या कारवाईपूर्वी संबंधितांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. दंगलखोरांच्या बेकायदेशीर मालमत्तांवर ही कारवाई केली जात आहे, अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे.
या दंगलीचे सूत्रसंचालन केल्याचा आरोप असणाऱ्या डॉ. नफीस अहमद याच्या मालकीची राजा पॅलेस ही इमारत शनिवारी सकाळी भुईसपाट करण्यात आली. ही कारवाई बरेली विकास प्राधिकरणाकडून करण्यात आली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही इमारत नियमांचा भंग करुन बेकायदेशीररित्या बांधण्यात आली होती, असे स्थानिक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच इमारत पाडतात सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यात आले आहे. पाडविण्याआधी नोटीस देण्यात आली होती, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
26 सप्टेंबरला दंगल
26 सप्टेंबरला या शहरात मोठी धार्मिक दंगल झाली होती. येथील मशिदीत त्यावेळी 2,000 हून अधिक लोकांचा जमाव जमला होता. प्रक्षोभक भाषणे करण्यात आल्याने जमाव अनियंत्रित झाला. त्याने शहरात अनेक स्थानी दगडफेक आणि जाळपोळ केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीहल्ला करावा लागला. तसेच अश्रूधुराची नळकांडी फोडावी लागली होती. काही तासांच्या नंतर दंगल नियंत्रणात आली. तथापि, दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली.
सैलानी भागात घरांवर बुलझोझर
या शहराच्या सैलानी भागातही स्थानिक प्रशासनाने बुलडोझर चालविला आहे. दंगल घडवून आणणाऱ्या लोकांच्या बेकायदेशीर बांधकामांना लक्ष्य केले जात आहे. किमान चाळीस घरे भुईसपाट करण्यात आली असून ही कारवाई करण्यापूर्वी या लोकांना नोटीसा देण्यात आल्या होत्या, अशी माहिती प्रशासनाकडून दिली गेली.