न्यूयॉर्कमध्ये मोफत प्ले-स्टेशनसाठी दंगल
स्टेशनवर चढून पोलिसांवर फेकल्या बाटल्या : यू-ट्युबरवर गुन्हा दाखल
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात शुक्रवारी दंगल भडकली. लोकांनी रेल्वेस्थानक आणि वाहनांवर चढून पोलिसांवर बाटल्यांचा मारा केला तसेच बॅरिकेड्स तोडले आहेत. हा प्रकार युट्यूबरच्या आवाहनामुळे जमा झालेल्या लोकांकडून झाला आहे. काई सीनेत नावाच्या यू-ट्यूबरने लोकांना मोफत प्ले स्टेशन देण्याची घोषणा केली होती.
युनियन स्क्वेयर पार्क येथे 2 हजार लोकांचा जमाव जमला होता. तेथे पाहता पाहता भांडण होत दगडफेक सुरू झाली. यात अनेक जण जखमी झाले असून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. जमावाला नियंत्रित करण्यासाठी घटनास्थळी हजार पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते.
यू-ट्यूबर सीनातने एका व्हिडिओद्वारे स्वत:च्या चाहत्यांना 300 प्ले स्टेशन्सचे वाटप करण्याची घोषणा केली होती. सीनातचे 10 दशलक्ष फॉलोअर्स असून त्यापैकी अनेक जण शुक्रवारी दुपारी एक वाजता युनियन स्क्वेयर येथे जमू लागले. या लोकांदरम्यान प्ले-स्टेशन मिळविण्यासाठी भांडण सुरू झाले, लोक परस्परांना मारहाण करू लागले. जमाव नियंत्रणाबाहेर गेल्याने लोकांनी वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली.
यू-ट्यूबरने स्थिती बिघडत असल्याचे पाहून लाइव्ह-स्ट्रीमिंगदरम्यान लोकांना अश्रूधूराचा मारा केला जात असून स्वत:ची सुरक्षा स्वत: करा असे म्हटले होते. स्थिती नियंत्रणाबाहेर जात मोठ्या संख्येत लोक जखमी झाले. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवत स्थितीवर नियंत्रण मिळविले. या दंगलीप्रकरणी अनेक जणांना अटक करण्यात आल्याची माहिती न्यूयॉर्क शहर पोलीस प्रमुख जेफ्री माडेरे यांनी दिली आहे.
यू-ट्यूबर काई सीनातलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दंगलीदरम्यान पोलिसांनी युनियन स्क्वेयर येथून जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रोखल्या होत्या. यू-ट्यूबरने विना अनुमती हा कार्यक्रम आयोजित केला होता असे चौकशीत आढळून आले आहे.