जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या आणि आता निष्प्रभ करण्यात आलेल्या अनुच्छेद 370 चे पुनरुज्जीवन करण्यात यावे, या प्रस्तावावरुन सलग तिसऱ्या दिवशी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला आहे. हा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाने मांडला आहे. भारतीय जनता पक्षाने या प्रस्तावाला जोरदार विरोध केला असून गेले तीन दिवस या वादाचे पडसाद विधानसभेत उमटत आहेत.
शुक्रवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी प्रस्तावाविरोधात जोरदार घोषणा करुन सभागृह डोक्यावर घेतले. ‘पाकिस्तानका अजेंडा नही चलेगा’ अशा घोषणा त्यांनी सातत्याने दिल्या. भारतीय जनता पक्षाच्या अनेक सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ येऊन घोषणा दिल्या. त्यानंतर सभाध्यक्ष अब्दुल रहीम यांनी भारतीय जनता पक्षाच्या 12 सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्याचा आदेश दिला. मार्शल्सनी त्यानुसार त्यांना सभागृहाबाहेर काढले. सभाध्यक्षांच्या या कृतीच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या उर्वरित सदस्यांनी सभात्याग केला.
प्रस्ताव संमत
पीडीपीने मांडलेला प्रस्ताव दोन दिवसांपूर्वी विधानसभेने संमत केला आहे. तो प्रस्ताव या केंद्रशासित प्रदेशाचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी मांडला होता. भारतीय जनता पक्षाने या प्रस्तावाचा आपला विरोध सुरुच ठेवला आहे. गुरुवारी याच मुद्द्यावरुन विधानसभेत अक्षरश: मारामारी झाली होती. त्यामुळे गेले तीन दिवस सभागृहाचे कामकाज ठप्प आहे. हा प्रस्ताव घटनाबाह्या असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला असून यापुढेही त्याला विरोध करण्याचा निर्धार केला आहे. संसदेने 370 वा अनुच्छेद निष्प्रभ केल्याने जम्मू-काश्मीर विधानसभेला असा प्रस्ताव स्वीकारण्याचा अधिकार नाही, असे या पक्षाचे म्हणणे आहे.