बंगाली अभिनेते मनोज मित्रा यांचे निधन
वृत्तसंस्था / कोलकाता
सुप्रसिद्ध बंगाली नाट्या अभिनेते मनोज मित्रा यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. गेले अनेक महिने ते आजारी होते. मंगळवारी सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी कोलकाता येथे एका खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. बंगाली नाटकांप्रमाणेच त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही अभिनय केला होता.
पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मनोज मित्रा यांचा जन्म 1938 मध्ये तत्कालीन अविभाजित बंगाल प्रांतात झाला होता. ते तत्वज्ञान या विषयाचे पदवीधर होते. महाविद्यालयातच त्यांना नाटकांमध्ये भूमिका करण्याची आवड निर्माण झाली आणि नंतर ते या क्षेत्रात प्रसिद्ध झाले. 1957 पासून त्यांनी नाटकांमध्ये भूमिका करण्यास प्रारंभ केला. त्यांनी ‘मृत्युर चोखे जाल’ नामक नाटकाचे लेखनही केले आहे. अभिनयाप्रमाणेच त्यांना विद्यादानात ही स्वारस्य होते. अनेक महाविद्यालयांमध्ये त्यांनी तत्वज्ञान हा विषय शिकविण्याचे काम केले. रविंद्र भारती विद्यापीठात ते याच विषयाचे विभागप्रमुख होते. ‘चाक भंगा मधू’ या नाटकातील त्यांच्या अभिनयाने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले होते. 1979 पासून त्यांनी चित्रपटातही अभिनय करण्यास प्रारंभ केला. त्यांनी ‘सुंदरराम’ नामक नाट्यामंडळाची स्थापनाही केली होती.