फिनिशर’च्या जागेसाठी रिंकू दावेदार, पण स्पर्धा तीव्र : नेहरा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्फोटक डावखुरा रिंकू सिंग भारताच्या ‘टी-20’ विश्वचषक संघातील ‘फिनिशर’च्या जागेसाठी दावेदार म्हणून उदयास आला आहे. परंतु या स्थानाच्या बाबतीत त्याला इतर सहकारी फलंदाजांच्या तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागेल, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने व्यक्त केले आहे.
पुढील वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत रिंकू धमाकेदार फॉर्ममध्ये दिसलेला आहे आणि शुक्रवारी रायपूरमध्ये झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने मालिका 3-1 अशी जिंकताना 20 धावांनी जो विजय मिळविला त्यात त्याच्या 29 चेंडूंतील 46 धावांचा मोलाचा वाटा राहिला. ‘रिंकू सिंग हा भारताच्या टी-20 विश्वचषक संघातील स्थानाचा दावेदार आहे यात शंका नाही. पण विश्वचषक स्पर्धा अजून दूर आहे आणि तो जे स्थान मिळवू पाहत त्यासाठीच्या शर्यतीत अनेक आव्हानवीर आहेत’, याकडे नेहराने लक्ष वेधले.
रिंकूने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत काही निर्णायक खेळी केलेल्या आहेत. तिऊवनंतपुरम येथील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने 44 धावांनी मिळविलेल्या विजयात त्याच्या नऊ चेंडूंतील नाबाद 31 धावांची मोठी भूमिका होती. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे टी-20 विश्वचषकासाठीच्या संघात असतील की नाही याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. अशा परिस्थितीत विश्वचषकासाठीच्या ‘टी-20’ संघात मोठे बदल होऊ शकतात आणि रिंकू सिंग हा ‘स्लॉग ओव्हर्स’साठीच्या फलंदाजाच्या स्थानाकरिता एक प्रमुख दावेदार बनू शकतो.
यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्मा आणि तिलक वर्मा हेही आहेत. शिवाय श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या कुठल्या स्थानावर खेळतील त्यावरही चर्चा करावी लागेल. त्यामुळे 15 सदस्यीय संघात किती जागा उपलब्ध आहेत हे पाहावे लागेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, रिंकूने सगळ्यांचे डोळे उघडले आहेत आणि सगळ्यांवर दडपण आणले आहे. पण अजून बराच वेळ आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा दौरा होणार असून त्यानंतर ‘आयपीएल’ होणार आहे, असे नेहराने सांगितले.
भारताच्या युवा वेगवान गोलंदाजांचाही नेहराने बचाव केला. ‘पहिल्या तीन सामन्यांतील परिस्थिती वेगळी होती आणि बरेच गोलंदाज बदलले गेले आहेत. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या आपल्या अनुभवी गोलंदाजांना विश्रांती देण्यात आली आहे. जर तुम्ही आवेश खान आणि मुकेश कुमार यांच्याबद्दल बोल असाल, तर ते नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलेले आहेत. पहिल्या तीन सामन्यांमध्ये 200 हून अधिक धावा काढल्या गेल्या खऱ्या, पण केवळ भारतीय गोलंदाजांनीच धावा दिल्या असे नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनीही खूप धावा दिल्या. या परिस्थितीत मुकेश कुमार ही भारताच्या दृष्टीने खूप सकारात्मक बाब आहे. त्याने ज्या पद्धतीने ओल्या झालेल्या चेंडूने गोलंदाजी केली तसेच यॉर्कर्स टाकले आणि शेवटच्या षटकांमध्ये जी गोलंदाजी केली ती जबरदस्त होती’, असे नेहरा पुढे म्हणाला.