1 लाख कुटुंबांना हक्कपत्रांचे वितरण करणार
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची माहिती : सरकारच्या दोन वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर 20 रोजी कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेस सरकारच्या दोन वर्षापूर्वीच्या पार्श्वभूमीवर 20 मे रोजी विजयनगर येथे होणाऱ्या मेळाव्यात तांडा आणि हट्टीसह महसूल जमिनींवर घरे बांधून राहिलेल्या 1 लाख कुटुंबांना हक्कपत्रांचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. रविवारी रामनगर येथे झालेल्या जिल्हा युवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शपथविधी समारंभात ते बोलत होते.
शिवकुमार पुढे म्हणाले, सत्तेत आल्यानंतर काँग्रेस सरकारने आपले वचन पाळले आहे. युवा निधीच्या माध्यमातून तऊणांच्या मदतीला धावले आहे. महिलांच्या बाजूने ऐतिहासिक योजना आणून पक्षाने इतिहास घडवला आहे. निजद आणि भाजपने महिलांसाठी मोफत बसप्रवास आणि गृहलक्ष्मीसह अनेक योजना दिल्या आहेत का?, असा प्रश्न करीत युवा काँग्रेस पक्ष हे नेतृत्व विकासासाठी एक चाचणी केंद्र आहे. जर तुम्हाला नेता म्हणून वाढायचे असेल तर तुम्हाला तळागाळातून काम करावे लागेल. तुम्हाला दिलेली जबाबदारी तुम्ही पार पाडली पाहिजे. तऊणांना तुमच्या शक्तीची जाणीव नाही. आपण कोणाच्याही टीकेला घाबरू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
तुम्हाला तुमच्या क्षेत्रात, बूथ पातळीवर मजबूत व्हायचे आहे. तुम्ही केलेले काम कायमचे टिकले पाहिजे. तुम्हाला लोकांची मने जिंकायची आहेत. तुम्हाला नेते बनवण्याचे माझे ध्येय आहे. तुम्ही माझे मित्र आहात. युवा आणि विद्यार्थी काँग्रेसमधून वाढलेले लोक कधीही पक्ष सोडून जात नाहीत. बूथ, पंचायत आणि वॉर्ड पातळीवर दिलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण कराल आणि पक्षासाठी अधिक मते मिळवाल तेव्हाच तुम्ही एक नेता म्हणून उदयास येऊ शकता, असेही उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले.