अज्ञाताकडून रिक्षा पेटविण्याचा प्रकार
खानापूर शहरातील भट गल्लीतील घटना
खानापूर : खानापूर शहरातील भट गल्ली येथील रहिवासी महेश जाधव यांची रिक्षा गुरुवारी रात्री 2 वाजता पेटविण्यात आली. आगीच्या ज्वालामुळे शेजारील नागरिक जागे झाले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात न आल्याने रिक्षा जळून खाक झाली आहे. तसेच नदी घाटावरील प्लास्टिक कचराकुंड्याही पेटविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. आग लावण्याची घटना गांज्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकाकडून झाल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. याबाबत खानापूर पोलिसांना माहिती देण्यात आली असून खानापूर पोलीस पुढील तपास करत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, महेश जाधव हे भट गल्लीतील रहिवासी असून त्यांचा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आहे. रोजच्याप्रमाणे त्यांनी आपली रिक्षा घरासमोर गुरुवारी रात्री थांबविली होती. रात्री दीडच्या सुमारास रिक्षा पेटविण्यात आल्याने मोठ्या आगीच्या ज्वालामुळे आजुबाजूचे लोक जागे झाले. त्यांनी रिक्षाला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका मोठा असल्याने रिक्षाचा काही भाग जळून खाक झाला आहे. यात जाधव यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती रात्रीच पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. नदी घाटावर कचरा संकलनासाठी ठेवलेले प्लास्टिकचे कचराकुंडही या समाजकंटकांनी पेटवून दिले आहे. जेव्हा रिक्षाला आग लागल्यानंतर शेजारील लोक घराबाहेर आले त्यावेळी काही तरुण मुले या भागातून पळून जात असल्याचे काहीजणांनी पाहिले आहे. शहरातील अशी आग लावण्याची पहिलीच घटना आहे. शहरात गांज्याच्या व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढले असल्याने चोऱ्या आणि अशा आगी लावण्याच्या घटना घडत आहेत. यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.