For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रेंच ओपननंतर रिचर्ड गॅस्केट निवृत्त होणार

06:31 AM Oct 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
फ्रेंच ओपननंतर रिचर्ड गॅस्केट निवृत्त होणार
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

प्रेंच टेनिसचा लिटल मोझार्ट, असे एकेकाळी मानला गेलेला रिचर्ड गॅस्केट निवृत्त होणार आहे. एकही ग्रँडस्लॅम जिंकू न शकलेल्या गॅस्केटने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे सांगितले.

फ्रान्सचा हा 38 वर्षीय टेनिसपटू एकहाती बॅकहँड फटका मारण्यासाठी खास ओळखला जातो. त्याने एल’इक्विप वृत्तपत्राशी बोलताना गुरुवारी सांगितले की, घरच्या प्रेक्षकांसमोर फ्रेंच ओपन स्पर्धेनंतर आपण निवृत्त होणार आहे. पुढील वर्षी रोलाँ गॅरोवर होणारी स्पर्धा शेवटची असेल. हा निर्णय घेण्याची हीच योग्व वेळ आहे आणि हीच सर्वोत्तम स्पर्धाही आहे, असे तो म्हणाला.

Advertisement

गॅस्केटने 2007 मध्ये जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर झेप घेतली होती, हेच त्याचे सर्वोच्च मानांकन होते. त्याला एकेकाळी ग्रँडस्लॅमचा संभाव्य विजेता मानला जात होता. पण त्याला एकदाही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आली नाही. विम्बल्डनमध्ये त्याने दोनदा, तसेच यूएस ओपनमध्येही एकदा उपांत्य फेरी गाठली होती. त्याने टूरवरील 16 स्पर्धा जिंकल्या. गेल्या वर्षी ऑकलंडमधील स्पर्धेत त्याने शेवटचे जेतेपद पटकावले होते. 2017 मध्ये फ्रान्सने डेव्हिस चषक स्पर्धा जिंकली होती, त्या संघाचा गॅस्केट हा सदस्य होता.

20 वर्षांपूर्वी फ्रान्सच्या ‘गिफ्टेड जनरेशन’मध्ये जे टेनिसपटू होते, त्यातील निवृत्त होणारा गॅस्केट हा तिसरा खेळाडू आहे. याआधी जो विल्फ्रेड त्सोंगा व गिलेस सिमोन यांनी निवृत्ती घेतली आहे. गेल मोनफिल्स हाही त्या जनरेशनमधील आणखी खेळाडू आहे. गॅस्केट सध्या जागतिक क्रमवारीत 133 व्या स्थानावर आहे. व्यावसायिक खेळाडू बनल्यानंतर त्याने आजवर 1005 सामने खेळले आहेत.  सुरुवातीला नदालशी त्याची तुलना केली जात होती. नदालने स्वत:ला महान खेळाडू म्हणून स्थापित केले. पण गॅस्केटला ती मजल मारता आली नाही. या दोघांची 18 वेळा गाठ पडली. पण गॅस्केटला नदालवर एकदाही विजय मिळविता आला नाही.

Advertisement
Tags :

.