For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जपानमध्ये तांदळाचा तुटवडा, सुपरमार्केट रिकामी

09:47 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
जपानमध्ये तांदळाचा तुटवडा  सुपरमार्केट रिकामी
Advertisement

भूकंप-वादळाच्या भीतीने लोकांकडून घरात साठा : पुढील महिन्यापर्यंत सुधारणार स्थिती

Advertisement

वृत्तसंस्था /टोकियो

जपानमध्ये तांदळाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील काही आठवड्यांपासून जपानच्या अनेक सुपर मार्केट्समध्ये तांदळाचा साठाच संपला आहे. जून 1999 नंतर पहिल्यांदाच जपानमध्ये तांदळाचा तुटवडा दिसून येत आहे. तर ज्या सुपर मार्केट्समध्ये तांदूळ मिळतोय, तेथे लोकांना कमी प्रमाणात तांदूळ खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे. जपानमध्ये सरकारने भूकंप आणि चक्रीवादळाच्या धोक्यावरून इशारा दिला होता. यानंतरच लोकांनी भीतीपोटी तांदूळ खरेदी करत घरांमध्ये त्याचा साठा करण्यास सुरुवात केली, यामुळे बाजारात तांदळाचा साठा कमी झाला आहे. जपानमध्ये मे ते नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीला टाइफून सीजन म्हटले जाते. यादरम्यान सुमारे 20 वादळं जपानला धडकत असतात. यंदा 19-21 वादळं जपानला धडकण्याची शक्यता आहे. जपान सरकारने याच वादळांसंबंधी इशारा दिला होता, ज्यानंतर लोक घाबरून घरांमध्ये तांदळाचा साठा करू लागले आहेत.

Advertisement

नव्या पिकानंतर सुधारणार स्थिती

तांदळाच्या तुटवड्यादरम्यान जपान सरकारने लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. देशात काही ठिकाणी तांदळाच्या साठ्यात घट झाली असली तरीही लवकरच आम्ही या स्थितीतून बाहेर पडू. सध्या तांदळाचा पुरेसा साठा असल्याचे कृषिमंत्री तेत्सशी सकामोतो यांनी सांगितले आहे. जपानमध्ये भातपिक वर्षातून एकदाच घेतले जाते. सप्टेंबर महिन्यात नव्या भातपिकाची कापणी सुरू होईल, ज्यानंतर बाजारात नवे पीक आल्यावर स्थितीत सुधारणा होणार आहे.

पर्यटकांची संख्याही कारणीभूत

जपानमध्ये 13 ऑगस्टपासून ओबोन फेस्टिव्हल सुरू झाला आहे. ओबोन फेस्टिव्हलदरम्यान लोक स्वत:च्या पूर्वजांना श्रद्धांजली वाहत असतात. तसेच पूर्वजांच्या स्मरणार्थ सोहळ्यांचे आयोजन केले जाते. या फेस्टिव्हलमुळे लोक दीर्घ सुट्यांवर असल्याने देखील तांदळाची मागणी वाढली आहे.  तसेच जपानमध्ये यंदा विक्रमी संख्येत विदेशी पर्यटक पोहोचले आहेत. जपान नॅशनल टूरिजम ऑर्गनायझेशननुसार जपानमध्ये यंदा जूनपर्यंत 31 लाखाहून अधिक विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या फॉरेन अॅग्रिकल्चर सर्व्हिस अहवालानुसार जपानमध्ये 2023-24 मध्ये भातपिकाचे एकूण उत्पादन 7.3 दशलक्ष टन राहिले. तर तांदळाची मागणी 8.1 दशलक्ष टन राहिली आहे.

1918 मधील आंदोलनाची पार्श्वभूमी

जपानमध्ये जुलै 1918 मध्ये तांदळाचा तुटवडा आणि वाढत्या किमतींमुळे आंदोलन झाले होते. तांदळाच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांनी सरकारच्या विरोधात निदर्शने केली होती. या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते, अनेक ठिकाणी जाळपोळ, लूट, पोलीस स्थानक आणि शासकीय कार्यालयांवर हल्ले झाले होते. या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान तेराउजी मसाताके यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यादरम्यान सुमारे 25 हजार लोकांना अटक करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.