गुंजी परिसरात भात लागवड अंतिम टप्प्यात
वार्ताहर/गुंजी
दरवर्षी 90 टक्के भातपेरणी करणारा गुंजी परिसरातील शेतकरी यावर्षी गैरहंगामी पावसामुळे 90 टक्के भात लागवड करण्याची नामुष्की ओढवली आहे. अद्यापही या भागामध्ये भात लागवड करण्याचे काम सुरू असून सध्या भात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. वास्तविक गुंजीसह परिसरात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने कुरीच्या सहाय्याने भातपेरणी केली जाते. मात्र यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच जोरदार पावसास प्रारंभ झाल्याने पेरणी केलेले भातपीक उगवले नाही. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मात्र शिवारात पाणी भरल्याने दुसऱ्यावेळी पेरलेले भातही कुजून वाया गेल्याने शेतकऱ्यांना भात लागवड करण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. त्यामुळे या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी तरू पेरणी केली. मात्र अनेक शेतकऱ्यांचे तरवेही जंगली प्राण्यांकडून फस्त केल्याने असे शेतकरी शेजारील शेतकऱ्यांच्या उरलेल्या तरव्यांवर विसंबून होते. असे अनेक शेतकरी सध्या भात लागवड करीत आहेत.
या भागात यावर्षी बहुतांश क्षेत्रावर भात लागवड करावी लागल्याने ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर आणि मजूर मिळणे खूपच कठीण जात आहे. अनेक शेतकरी एकाचवेळी या कामात गुंतल्याने ट्रॅक्टर व मजुरांचाही तुटवडा मोठ्याप्रमाणात पडत आहे. त्यामुळे रामनगर, जगलबेट, राजवळ, आक्राळी, शिवठाण आदी परगावातील मजुरांची येण्या जाण्याच्या खर्चासह वाढीव मजुरीने भात लागवडीसाठी मदत घ्यावी लागली. मजुरीचे दर गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहेत. त्यामुळे दोनवेळा पेरणी करूनही भात उगवण न झाल्याने तोट्यात आलेला शेतकरी वाढलेल्या मजुरीने पोळला जात असल्याची चर्चा शेतकऱ्यांतून चर्चिली जात आहे. मात्र वर्षभर येथील शेतकरी वर्ग अथक परिश्रम घेऊन आता पुन्हा भात लागवड करीत असून भात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे.