चीनमध्ये सर्वाधिक खाल्ला जातो भात
भारतातील अनेक राज्यांमध्ये भात अत्यंत आवडीने खाल्ला जातो, कित्येकांचे जेवण भाताशिवाय अपूर्णच मानले जाते. काही लोक भात खाल्ल्याशिवाय राहूच शकत नाहीत. गावांमध्ये आजही लोक दिवसातून तीनवेळा भात खात असतात. विशेषकरून किनारपट्टी असलेल्या भागात लोकांच्या आहारात भाताला विशेष महत्त्व आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूमध्ये भाताचा आहारातील वापर हा वैविध्यपूर्ण असतो.
कुठल्या देशाचे लोक सर्वाधिक भात खातात या प्रश्नाचे उत्तर भारत असे समजत असाल तर तुम्ही चुकीचे ठराल. भारतापेक्षाही एका देशातील लोक सर्वाधिक भात खात असतात. भाताच्या आहारातील वापराप्रकरणी चीन प्रथम क्रमांकावर आहे. जगातील सुमारे 30 टक्के तांदळाचे उत्पादन चीनमध्ये होते आणि सर्वाधिक खपही चीनमध्येच होत असतो.
भाताच्या सेवनाप्रकरणी चीननंतर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतानंतर याप्रकरणी इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. भात खाण्याप्रकरणी आपला शेजारी देश बांगलादेशचा क्रमांक लागतो. बांगलादेशातील लोकांच्या आहारात भाताला विशेष स्थान आहे. त्यानंतर व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि थायलंड या देशांचा क्रमांक लागतो.
आशियाई देशांमधील आहारात भाताचे सर्वाधिक प्रमाण आहे. तर युरोप आणि आफ्रिकेत भाताचा आहारात फारसा समावेश नसतो. याकरता कृषीचे स्वरुपही कारणीभूत आहे. तसेच हवामान देखील आहाराचे स्वरुप ठरविण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. आशियातील मध्यपूर्वेतील देश वगळल्यास अन्य सर्व देशांमध्ये कित्येक शतकांपासून भात हाच मुख्य आहार स्रोत आहे.