झाडनावगा येथे भरदिवसा हत्तींकडून भात फस्त
वार्ताहर/नंदगड
झाडनावगा (ता. खानापूर) येथील शेतवडीत भरदिवसा सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हत्तींचा कळप उभ्या भात पिकात खाऊन तुडवून नुकसान करत होता. हत्तींना हुसकावण्यासाठी शेतकरी व वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. गेल्या महिन्याभरापासून खानापूर तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात हत्तींच्या कळपाकडून ऊस व भात पिकांचे नुकसान सुरूच आहे. प्रारंभी बाळगुंद, मस्केनटी, हतरवाड, तारवाड, त्यानंतर नागरगाळी, लोंढा, गुंजी, संगरगाळी, सावरगाळी भागातील शेतवडीतील भात व ऊस पिकांत धुडगूस घालण्यात आला होता. त्यानंतर हत्तीच्या कळप आता थेट नावगा, नंदगडच्या दरम्यान असलेल्या जंगल परिसरात वास्तव्यास आहे.
वरील भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीतील पिकांचे बऱ्याच प्रमाणात हत्तांrकडून नुकसान करण्यात आले आहे. सुरुवातीला दिवसा जंगलात राहणारा हत्तींचा कळप रात्रीच्या वेळी पिकात घुसत होता. गेल्या तीन चार दिवसापासून मात्र दिवसाढवळ्या हा कळप भात पिकात येत असल्याने शेती कामासाठी गेलेल्या शेतकरी व मजुरांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी संबंधित भागातील शेतकऱ्यांना हत्तींपासून सतर्क रहावे असे आवाहनही केले आहे. शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या परीने शेतवडीत भातपिकात घुसलेल्या हत्तींना पुन्हा जंगलात पाठवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. परंतु अन्नपाण्याच्या शोधात जवळच्या जंगलातील हत्ती शेतवाडीत येत असल्याने शेतकऱ्यांत मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.