पावसाची तमा न बाळगता भातकापणी सुरू
खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकरी वर्ग भातकापणी करून घरी आणण्याच्या लगबगीत
खानापूर : गेल्या दोन-चार दिवसांपासून आकाशात दाटून येणारे ढग त्यामुळे पाऊस केंव्हा पडेल याची शाश्वती नाही. अशी परिस्थिती असताना देखील पावसाची तमा न बाळगता खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग कापणीला आलेल्या भातपीक पावसापासून वाचवून घरी आणण्याच्या लगबगीत लागला आहे. त्यामुळे शेतातील पिवळे सोने कापण्याची धांदल उडाली आहे. खानापूर तालुक्यात यावर्षी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या पाच महिन्यापासून पावसाने जराही उसंत घेतलेली नाही. तालुक्यातील मुख्य पीक असलेले भातपीक आता कापणीला आले आहे. संपूर्ण शिवारातील भातपीक पिकले असून शेतात पिवळ्या जर्द सोनेरी छटानी शिवारे फुलली आहेत.
भात कापणी अगदी तोंडावर आली असताना पावसाने मात्र शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरवली आहे. सतत होत असलेल्या हवामानातील बदल आणि ढगाळ वातावरण आणि होत असलेला पाऊस यामुळे शेतकरी हातातेंडाशी आलेले भातपीक वाया जाईल, याच विचारात आहे. अशातच पावसाने गेल्या दोन दिवसापासून उघडीप दिली असली तरी संपूर्ण आकाश ढगानी आच्छादले आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण असले तरी शेतकरी हातातोंडाशी आलेले भातपीक कापून वळी लावण्याच्या गडबडीत लागला आहे. तर काही ठिकाणी शेतकरी तट्टाचा वापर करून कापलेले भात मळून घरी आणत आहेत. यासाठी भात मळणी वारे देण्यासाठी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत.
वारे देण्यासाठी पंखाचा वापर
भाताला वारे देण्यासाठी पंखाचा वापर करण्यात येत आहे. तर बरेच शेतकरी भात कापणीसाठी यंत्राचाही वापर करत आहेत. त्यामुळे भात मळूनच घरी आणण्यात येत आहे. एकूणच सुगीचे वातावरण असले तरी ढगाळ वातावरण आहे. काटे जमीन, माळरान आणि पानथळ जमिनीतील भात एकाचवेळी कापणीला आल्याने मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी भात कापणीत व्यस्त झाल्याने ग्रामीण भागातील गावात फक्त म्हातारी माणसेच घरी दिसून येत आहेत.
खानापूर बाजारपेठेत शुकशुकाट
भात कापणीचा परिणाम खानापूर बाजारपेठेवर झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून बाजारपेठेत पूर्णपणे शुकशुकाट जाणवत आहेत. एकूणच शेतकरी हातातोंडाशी आलेले भातपीक घरी आणण्याचा लगबगीत लागला आहे. पावसाने साथ दिल्यास भात पिकाची सुगी चांगली होणार आहे. यंदा झालेल्या पावसामुळे भात पिकाच्या उतारा चांगला येण्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे.