सततच्या पावसामुळे भातपीक धोक्यात
शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीन भर : परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्हे
खानापूर : गेल्या आठ-दहा दिवसापासून परतीचा पाऊस सतत सुरू असल्याने माळ शेतातील कापणीला आलेली भातपिके धोक्यात आली असून, सुरू असलेल्या पावसामुळे भात पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले भातपीक वाया जाण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पावसाच्या उघडिपीची वाट शेतकरी पहात आहे. मात्र हवामानातील वातावरण पाहता पुढील काही दिवस पाऊस होण्याची संभाव्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे माळ शेतातील भातपीक वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या जून महिन्यापासून मोसमी पावसाला सुरवात झाली. सुरवातील शेतकऱ्यांना पावसाने चांगला हंगाम दिला होता.
त्यामुळे भात पेरण्या आणि मशागतीची कामे शेतकऱ्यांनी वेळेवर आटोपली होती. भातासह सर्वच पिकांची उगवणही चांगली झाली होती. तालुक्यात माळ शेतावर भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच रांगीच्या जमिनतीही भातपीक घेतले जाते. माळरानावरील शेतात लवकर येणारे भात पेरले जाते. त्यामुळे माळरानावरील भात पिके पूर्णपणे कापणीला आली आहेत. काही शेतकऱ्यांनी भात कापलेले आहे. गेल्या आठ-दहा दिवसापासून सुरू असलेला परतीच्या पावसामुळे पिकलेले भात झडत असून काही ठिकाणी भात पूर्णपणे पडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माळरानावरील भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येत्या दोन दिवसात पाऊस पूर्णपणे थांबल्यास माळरानावरील भात पिकाची कापणी मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे. मात्र ढगाळ वातावरण व ऑक्टोबर हिटची उष्णता पाहता परतीच पाऊस अधिक होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.