परतीच्या पावसामुळे भात पिकाचे नुकसान
वार्ताहर/किणये
गेल्या आठ दिवसापासून झालेल्या परतीच्या पावसामुळे तालुक्यातील भात पिकांचे नुकसान झाले आहे. भातपीक कापणीला आलेले आहे. मात्र या कालावधीतच तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे भातपीक आडवे झाले आहे. यामुळे भात पिकाच्या उत्पादनात घट होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना याची चिंता लागून राहिली आहे. यंदा तालुक्यात दमदार मान्सून झालेला आहे. भात पोसवणीच्या कालावधीत पावसाने बरेच दिवस उघडीप दिली होती. या कालावधीत पावसाची पिकांसाठी नितांत गरज होती. सध्या मात्र तालुक्याच्या बहुतांशी भागात भातपीक कापणीला आलेले आहेत.
अशा कालावधीतच पाऊस पडल्यामुळे भातपिके आडवी झालेली आहेत. तसेच भात पिकामध्ये पाणीसुद्धा साचलेले आहे. त्यामुळे पाणथळ शिवारातील शेतकरी पाणी बाहेर काढताना दिसत आहेत.गेले आठ दिवस तालुक्यात परतीचा पाऊस सुरूच होता. मात्र या पावसाने मंगळवारी थोड्या प्रमाणात उघडीप दिली होती. त्यामुळे असेच चार ते पाच दिवस पावसाने उघडीप दिल्यास भातकापणीच्या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.