हलगा येथे डुकरांकडून भातपिकाचे नुकसान
खानापूर : तालुक्यातील हलगा येथील शेतकरी सातेरी व्हन्नाप्पा बंगडी यांच्या शेतातील भातपिकाचे रानटी डुकरांनी सलग दोन दिवस हैदोस घालून संपूर्ण दोन एकरमधील हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास 50 हजार रु. चे आर्थिक नुकसान झाले आहे. वनखात्याने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. तालुक्यात जंगली जनावरांच्या त्रासामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. आता सर्वच पिके तयार झाली असून दिवाळी आसपासच्या भातकापणीला सुरुवात होणार आहे. अशातच हातातोंडाशी आलेल्या पिकाचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. हलगा येथील शेतकरी सातेरी बंगडी यांच्या शेतातील भातपिकाचे रानटी डुकराकडून सलग दोन दिवस शेतात हैदोस घालून कापणीला आलेल्या भातपिकाचे डुकरांनी खाऊन तसेच शेतात धुडगूस घातल्याने भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. वनखात्याकडून पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे. मात्र अतिशय तोकडी मदत मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यासाठी वनखात्याने जंगली प्राण्यांपासून शेताचे संरक्षण होण्यासाठी वन्यप्राण्यांचा योग्यप्रकारे बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.