रिक्लेटोनच्या शतकाने द. आफ्रिकेला सावरले
दुसरी कसोटी, द. आफ्रिका प. डाव 3 बाद 184
वृत्तसंस्था / केपटाऊन
शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत चहापानापर्यंत यजमान द. आफ्रिकेने पाक विरुद्ध पहिल्या डावात 3 बाद 184 धावा जमविल्या होत्या. रिक्लेटोनचे नाबाद शतक तसेच कर्णधार बवुमाच्या नाबाद अर्धशतकाने संघाला सावरले.
या दुसऱ्या कसोटीत द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पाकच्या वेगवान गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत द. आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगलेच रोखून धरले. रिक्लेटोन आणि मारक्रेम या सलामीच्या जोडीने डावाला सावध सुरुवात करताना 15.2 षटकात 61 धावांची भागिदारी केली. पाकच्या खुर्रम शहजादने मारक्रेमला रिझवानकरवी झेलबाद केले. त्याने 40 चेंडूत 3 चौकारांसह 17 धावा जमविल्या. द. आफ्रिकेची ही सलामीची जोडी फुटल्यानंतर त्यांचे आणखीन दोन फलंदाज केवळ 11 धावांत तंबूत परतले. मोहम्मद अब्बासने मुल्डेरला रिझवानकरवी झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 5 धावा केल्या. तर आगा सलमानने स्टब्जला खाते उघडण्यापूर्वीच रिझवानकडे सोपा झेल देण्यास भाग पाडले. द. आफ्रिकेची यावेळी स्थिती 22.5 षटकात 3 बाद 72 अशी केविलवानी होती. स्टब्ज बाद झाल्यानंतर उपाहारासाठी खेळ थांबविण्यात आला.
रिक्लेटोन आणि कर्णधार बवुमा या जोडीने सावध फलंदाजी करत संघाला बऱ्यापैकी सावरले. या जोडीने चुकीचे फटके मारणे टाळले. खेळाच्या दुसऱ्या सत्रात द. आफ्रिकेचे शतक 180 चेंडूत फलकावर लागले. रिक्लेटोन आणि बवुमा यांनी चौथ्या गड्यासाठी अर्धशतकीय भागिदारी 66 चेंडूत तर शतकी भागिदारी 136 चेंडूत नोंदविली. रिक्लेटोनने 73 चेंडूत 7 चौकारांसह अर्धशतक तर 155 चेंडूत 14 चौकारांसह शतक झळकविले. बवुमाने 82 चेंडूत 6 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने चहापानापर्यंत चौथ्या गड्यासाठी अभेद्य 112 धावांची भागिदारी केली. चहापानावेळी द. आफ्रिकेने 50 षटकात 3 बाद 184 धावा जमविल्या होत्या. रिक्लेटोन 14 चौकारांसह 106 तर बवुमा 6 चौकारांसह 51 धावांवर खेळत आहेत. पाकतर्फे मोहम्मद अब्बास, खुर्रम शहजाद आणि सलमान आगा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या मालिकेतील पहिली कसोटी द. आफ्रिकेने दोन गडी राखून जिंकल्याने आता त्यांनी 1-0 अशी आघाडी मिळविली आहे.
संक्षिप्त धावफलक: द. आफ्रिका प. डाव 50 षटकात 3 बाद 184 (चहापानापर्यंत), (रिक्लेटोन खेळत आहे 106, बवुमा खेळत आहे 51, मारक्रेम 17, मुल्डेर 5, स्टब्ज 0, अवांतर 5, मोहम्मद अब्बास, सलमान आगा, खुर्रम शहजाद प्रत्येकी 1 बळी)