For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिव्हॉल्युशनरी गोवन्स ‘बॅक फूट’वर...

06:28 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
रिव्हॉल्युशनरी गोवन्स ‘बॅक फूट’वर
Advertisement

गोव्याचे प्रश्न घेऊन आवाज उठविणाऱ्या, प्रादेशिक पक्ष असलेल्या रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचा जन्म गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झाला. या पक्षाने गेली विधानसभा निवडणूक लढविली आणि पहिल्या प्रयत्नात एक आमदार निवडून आणण्याची कामगिरी केली. तसेच काही मतदारसंघात बऱ्यापैकी मते घेऊन इतर राजकीय पक्षांना दखल घेण्यास भाग पाडले. आता लोकसभा निवडणुकीत या पक्षाने अगोदर स्वतंत्ररित्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली व अचानक भूमिका बदलत इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याची भाषा सुरू केली व त्यासाठी काही अटी घातल्या मात्र अचानक बदललेल्या या भूमिकेमुळे आरजी पक्ष बॅक फूटवर गेला आहे.

Advertisement

गेल्या विधानसभा निवडणुकीत आरजीच्या उमेदवारांमुळे बऱ्याच मतदारसंघात मत विभागणी झाली व त्याचा फायदा भाजपला झाला. तेव्हापासून आरजी ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप होऊ लागला. जर आरजीचे उमेदवार रिंगणात नसते तर विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र दिसले असते, असे राजकीय तज्ञांचे मत आहे. भाजपचे काही उमेदवार हे अवघ्याच मतांनी विजयी झाले. भाजपविरोधी मतांची विभागणी झाल्याने भाजपचे उमेदवार निवडून आले. तेव्हापासून आरजीकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन बदलला होता.

आरजी पक्षाने अगोदर पंचायत, जिल्हा पंचायत, नगरपालिका अशी टप्प्याटप्प्याने पक्षाची बांधणी करून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणे महत्त्वाचे होते मात्र तसे न करता थेट विधानसभा निवडणुकीत उडी घेतली. तेव्हाच अनेकांना ही भाजपची चाल असावी, अशी शंका वाटत होती कारण मत विभागणीचा लाभ भाजपला मिळू शकतो, असे राजकीय तज्ञ गृहित धरत होते आणि नेमके विधानसभा निवडणुकीच्या निकालातून ते स्पष्ट झाले.  गोव्याशी निगडीत प्रश्न घेऊन आरजी पुढे येत असल्याने असंख्य युवक या पक्षाकडे आकर्षित झाले. त्यांना विदेशात स्थायिक झालेल्या व नोकरी करणाऱ्या गोमंतकीयांकडून पाठिंबा मिळू लागला. विदेशात असलेल्या गोमंतकीयांमध्ये भाजपबद्दल कमालीची नाराजी आहे. त्यामुळे आरजीच भाजपला टक्कर देऊ शकतो, असे त्यांना वाटू लागले मात्र विधानसभेच्या निकालानंतर आरजीबद्दल जी सहानभूती होती, त्यात घसरण सुरू झाली. दुसऱ्या बाजूने इतर विरोधी पक्षांनी आरजी ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप कायम ठेवला.

Advertisement

आता लोकसभा निवडणुकीत आरजीने स्वतंत्ररित्या निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला व सर्वांत अगोदर उमेदवारांची घोषणा करून प्रचारालादेखील सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक-दोन दिवस अगोदर आरजीने एक पत्रकार परिषद घेऊन इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली व त्यासाठी तीन अटी पुढे केल्या मात्र या अटी तसेच आरजीच्या पाठिंब्याचा प्रस्ताव इंडिया आघाडीच्या मडगावात झालेल्या बैठकीत फेटाळून लावण्यात आला.

इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी आरजी पक्षाने सोबत राहावे, यासाठी प्रयत्न केले मात्र त्याला आरजीने दाद दिली नाही. पण मग नंतर अचानक आपल्या भूमिकेत बदल करून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली. या अचानक बदललेल्या भूमिकेमुळे आरजी बॅक फुटवर गेला.  दोन दिवसांपूर्वीच दक्षिण गोव्यातील वेळ्ळी मतदारसंघात आरजीचे कार्यकर्ते प्रचार करताना त्यांना स्थानिक लोकांनी मत विभागणीसाठी उमेदवार उभा केलाय का? असा सवाल उपस्थित करून हाकलून लावण्याचा प्रकार घडला. त्यासंदर्भातील व्हिडीओ सध्या दक्षिण गोव्यात प्रचंड व्हायरल झालेला दिसतो आहे. या व्हिडीओ संदर्भात आरजीकडून अद्याप स्पष्टीकरण मात्र आलेले नाही.

आरजीने जर विनाअट इंडिया आघाडीला पाठिंबा दिला असता तर कदाचित आरजीच्या निर्णयाचे स्वागत झाले असते. त्याचबरोबर भाजपची ‘बी’ टीम असा जो आरोप होत असतो, त्यालाही लगाम बसला असता. आरजी पक्ष खरेच भाजपविरोधी आहे, हे चित्र सर्वांसमोर आले असते पण अटी घालून पाठिंबा देण्याचे चित्र पुढे केल्याने आरजीपीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मात्र बदल झालेला नाही.

आरजीपीने इंडिया आघाडीला पाठिंब्याचा प्रस्ताव देण्याऐवजी, आहे त्याच परिस्थितीत पुढे जाण्याचा निर्णय घेतला असता आणि भाजप व इंडिया आघाडीच्या विरोधातील भूमिका कायम ठेवली असती तर कदाचित आरजीपीकडे पाहण्याचा मतदारांचा दृष्टिकोन बदलला असता मात्र एका प्रस्तावामुळे आरजीपीची कोंडी झालेली आहे.  हल्लीच गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी लंडनची वारी केली होती. यावेळी त्यांनी लंडनमध्ये स्थायिक झालेल्या व नोकरी करणाऱ्या गोमंतकीयांकडे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी गोव्यात भाजपला सत्ता कशाप्रकारे मिळाली याचे स्पष्टीकरणही त्याठिकाणी सर्वांसमोर ठेवले असावे तसेच विदेशातून आरजीला होणारी मदत व पाठिंबा यावर आपली भूमिका मांडली असावी, अशी शक्यता आहे.

आरजीला विदेशातून मिळणारा पाठिंबा बंद झालाय का! अशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झालेली आहे. सोशल मीडियावरून आरजीवर प्रचंड टीका होत आहे. पूर्वी प्रमाणे सकारात्मक असा प्रतिसाद त्यांना लाभत नाही. पूर्वी आरजीने कोणताही विषय घेतला की, त्यांना प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. खास करून विदेशात स्थायिक झालेले व नोकरी करणारे गोमंतकीय त्यांचे समर्थन करायचे. यात आता बदल झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळेच आरजीपी बॅकफुटवर गेलाय, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.

महेश कोनेकर

Advertisement
Tags :

.