For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कला अकादमीसाठी क्रांतिचा एल्गार

01:26 PM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
कला अकादमीसाठी क्रांतिचा एल्गार
Advertisement

राज्यभरातील कलाकार एकवटले: सरकारला दिली 15 दिवसांची मुदत: मंत्री गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी

Advertisement

पणजी : गोवा क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला काल सोमवारी सरकारने कला अकादमीच्या केलेल्या दुर्दशेविरोधात राज्यातील कलाकारांनी क्रांती सुरू केली. कला अकादमी पूर्वीसारखी व्यवस्थित होईल, अशी आशा बाळगून गेली तीन वर्षे गप्प राहिलेले कलाकार अखेर काल एकवटले आणि बोलते झाले. पणजीत झालेल्या कलाकारांच्या सभेत कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी त्यांनी केली. कला अकादमी कलाकारांची आई असून, तिच्या रक्षणासाठी रस्त्यावर येण्याची तयारीही कलाकारांनी व्यक्त केली. कला अकादमी पूर्ववत करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.हा लढा कायदेशीर मार्गाने पुढे नेण्याचे ठरवून काही महत्त्वाचे ठरावही सभेत घेऊन एकमताने संमत करण्यात आले. काल सोमवारी येथील ‘गुज’च्या सभागृहात झालेल्या कलाकारांच्या सभेत व्यासपीठावर ज्येष्ठ नाट्याकलाकार देविदास आमोणकर, तियात्रिस्ट तोमाझिन कार्दोझ, पत्रकार किशोर नाईक गावकर, चार्ल्स कुरैया फाऊंडेशनचे आरमिनो रिबेरियो, तन्वी कारिया व राजदीप नाईक उपस्थित होते. सभेला गोव्याच्या कानाकोपऱ्यांतून तऊण, ज्येष्ठ कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमची कला अकादमी आम्ही मिळविणारच

Advertisement

कला अकादमीच्या झालेल्या दयनीय परिस्थितीबाबत प्रत्येक कलाकार विविध माध्यमांतून बोलत होता. मात्र उघडपणे विरोध करण्यासाठी पुढे कोणीच येत नव्हते. राजदीप नाईक हे एकटेच सडेतोडपणे व्यक्त होत होते. काही पत्रकारही वर्तमानपत्रातून व्यक्त होत होते. त्यामुळे हा लढा योग्य मार्गाने पुढे नेऊन कला अकादमी जशी होती, तशी परत मिळविण्यासाठी या सभेचे आयोजन करण्याचे ठरविले होते. आजची उपस्थिती पाहून आमची कला अकादमी आम्ही मिळविणारच, अशी आशा वाटू लागली आहे, असे नाट्यादिग्दर्शक कलाकार देविदास आमोणकर यांनी सांगितले.

हा केवळ नमुना, फौज उभी करायची आहे

आजच्या या सभेतील उपस्थिती हा केवळ नमुना आहे, फौज अद्याप उभी रहायची आहे. त्यामुळे सरकारने त्वरित लक्ष द्यावे आणि कला अकादमीबाबत विचार करावा, असा इशारा आमोणकर यांनी दिला आहे.

कोट्यावधी लुटले त्यांना देव पाहणार

कला अकादमीबाबत ज्यांनी बेकायदेशीर कर्म करून कोट्यावधी ऊपये लुटले आहेत, त्यांना देव बघणार आहेच. आमचा लढा कायदेशीरपणे असणार आहे. सरकारला जाब विचारला जाणार आहे, असेही आमोणकर यांनी सांगितले. यावेळी तोमाझिन कार्दोझ, कांता गावडे, मिनाक्षी मार्टीन्स यांनी कला अकादमी आणि त्यांचे नाते व्यक्त करताना अनुभव कथन केले. प्रकाश नाईक, राहूल म्हांबरे, संकेत भंडारी, तनोज अडवलपालकर, फ्रान्सिस कॉयल, राजन घाटे, मिलन वायगंणकर, गोविंद शिरेडकर, किशोर नाईक गावकर यांनी आपले विचार मांडले. साईनाथ परब यांनी कला अकादमी विषयी कविता सादर केली. राजदीप नाईक यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. शेवटी चार्ल्स कुरैया यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना एक मिनिट श्रद्धांजली वाहून सभेचा समारोप झाला.

मंत्री गोविंद गावडे यांच्यासमोरच त्यांच्या राजीनाम्याची मागणी

कलाकारांची पवित्र वास्तू मानल्या जाणाऱ्या कला अकादमीच्या डागडुजीच्या नावाखाली कोट्यावधी ऊपयांचा भ्रष्टाचार केला. कला अकादमीची लक्तरे वेशीवर टांगली. हा प्रकार पाहून कलाकार ढसाढसा रडत होता. गेल्या तीन वर्षांपासून कलाकारांची कुचंबणा होत होती. अखेर काल सोमवारी कलाकार एकवटले आणि त्यांनी या पहिल्या सभेत आपली घुसमट व्यक्त केली. सभेत कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे उपस्थितांमध्ये बसले होते.त्यांच्या उपस्थितीतच त्यांच्यावर जोरदार आरोप करून कलाकारांनी आपला संताप व्यक्त करताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Advertisement
Tags :

.