बियाणांसाठी वाढीव दर लावल्यास परवाने रद्द करा
कृषी आयुक्त वाय. एस. पाटील यांना निवेदन
विजापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी सरकारने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने बियाणे, खते आणि किटकनाशके विक्री करणाऱ्यांचे कायमस्वरूपी परवाने रद्द करावेत, अशी मागणी राज्य शेतकरी संघटना आणि हरित पक्षाने केली आहे. याबाबतचे निवेदन कृषी आयुक्त वाय. एस. पाटील यांना बेंगळूर येथे देण्यात आले. जिल्हाध्यक्ष संगमेश सागर यांनी, बियाणे, खते, किटकनाशके यांचे अधिकृत विक्रेते दरवर्षी कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या दराने त्याची विक्री करतात, उदा. कापूस बियाणे-नॉर्थ सीड्स कोड, यूएस अॅग्री सीड्स 7067 याची अधिक भावाने विक्री होत आहे. विहित किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा. बियाणे, खते आणि किटकनाशके वाढीव भावाने विकल्याबद्दल ज्यांचे परवाने कृषी विभागाने तात्पुरते रद्द केले आहेत त्यांनी यावर्षी पुन्हा वाढीव भावाने बियाणे, खते व किटकनाशके विकल्याचे आढळून आल्यास त्यांचे परवाने कायमचे रद्द करावेत. विजापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये याबाबत चौकशी करण्यात यावी. यामुळे योग्य दरात औषधे आणि खते मिळताना आर्थिक हातभार लागेल असे सांगितले.