पंचहमी योजना कमिटी बैठकीत घेतला कामाचा आढावा
योजना सुरळीत राबवण्याची चर्चा : गृहलक्ष्मी योजनेसाठी नोंदणी केलेल्या सर्व महिलांना अनुदानाचा लाभ
खानापूर : खानापूर तालुका पंचहमी योजना कमिटीची बैठक येथील तालुका पंचायत सभाभवनात गुरुवारी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपस्थितांचे स्वागत ता. पं. अधिकारी रमेश मेत्री यांनी करून महिन्याभरातील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी हेस्कॉमचे लेखा अधिकारी बी. ए. धरमदास यांनी तालुक्यातील गृहज्योती योजनेची माहिती देताना सांगितले.
तालुक्यात 61994 लाभार्थी असून ऑक्टोबर महिन्यात 1 कोटी 99 लाख 50 हजार इतके वीज बिल माफ करण्यात आल्याचे सांगितले. महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी विक्रम के. बी व एफडीए दीपक एम. पवार यांनी गृहलक्ष्मी योजनेसाठी नोंदणी केलेल्या सर्व महिलांना अनुदानाचा लाभ दिला जात असल्याचे सांगितले. तालुक्यामध्ये 64120 लाभार्थी आहेत. या लाभार्थीना प्रत्येकी 2000 प्रमाणे महिन्याला खानापूर तालुक्यामध्ये 12 कोटी 82 लाख 40 हजार इतकी रक्कम महिन्याला जमा होत आहे. अशी माहिती दिली.
शक्ती योजनेची माहिती देताना आगार प्रमुख संतोष बेनकनकोप यांनी सांगितले. ऑक्टोबरमध्ये 790179 महिला प्रवाशांनी मोफत प्रवास केला आहे. 2 कोटी 24 लाख 23 हजार इतकी रक्कम झाली आहे. तालुक्यामध्ये युवा निधीचे लाभार्थी 9129 आहेत. युवा निधीचा निधी जुलै महिन्यापर्यंत जमा झाला आहे. युवा निधी तीन महिन्यातून एकदा जमा करण्यात येतो, अशी माहिती दिली. अन्नपुरवठा खात्याचे अधिकारी संतोष यमकनमर्डी म्हणाले,
खानापूर तालुक्यामध्ये रेशन कार्डधारकांना व्यवस्थित रेशन वाटप सुरू असून, या महिन्यामध्ये जी बीपीएल कार्ड रद्द केली जात आहेत ती कोणाकडून व का केली जात आहेत असे विचारले असता त्यांनी केंद्र सरकारकडून आलेल्या यादीप्रमाणे आम्ही बीपीएल कार्ड रद्द करत आहोत असे सांगितले. बैठकीला गॅरंटी योजना जिल्हा उपाध्यक्ष रुद्रय्या हिरेमठ उपस्थित होते. यावेळी खानापूर तालुका गॅरंटी योजनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला योजनेचे सदस्य प्रकाश मादार, बाबू हत्तरवाड, प्रियांका गावकर, रुद्रप्पा पाटील, शांताराम गुरव, राजा कुडाळे, इसाखान पठाण, संजय गावडे, गोविंद पाटील उपस्थित होते.