सभाध्यक्ष-सभापतींकडून अधिवेशन तयारीचा आढावा
अधिकाऱ्यांना केल्या विविध सूचना : आंदोलनस्थळीही सुविधा पुरविण्याचे आदेश
बेळगाव : सुवर्णविधानसौध येथे दि. 8 डिसेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या काळात कोणत्याही प्रकारच्या त्रुटींना अधिकाऱ्यांनी थारा देऊ नये, जबाबदारीने कार्य करावे व हिवाळी अधिवेशन यशस्वी करावे, असे विधानसभाध्यक्ष यु. टी. खादर फरीद यांनी सांगितले.
बुधवारी सुवर्णविधानसौधमध्ये अधिवेशनाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना विधानसभाध्यक्ष पुढे म्हणाले, दि. 8 ते 20 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या अधिवेशनासाठी नियोजित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्य करावे, कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवल्यास त्वरित संबंधितांच्या निदर्शनास आणून त्या समस्या दूर कराव्यात, अधिवेशनाच्या काळात नेटवर्कची समस्या भासू नये, याची काळजी घेण्याबरोबरच पुरेशा संगणकांची व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली.
अधिवेशनाच्या काळात परिसरात आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलने करणाऱ्या आंदोलकांसाठी स्थळ निश्चित करावे. या परिसरात पायाभूत सुविधा व पोलीस संरक्षण द्यावे, सुवर्ण विधानसौधमधील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासह वाहतूक व्यवस्थाही सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अधिवेशनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी साहाय्यवाणी केंद्र स्थापन करण्याची सूचना सभाध्यक्षांनी दिली.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. सुवर्णविधानसौधच्या आवारात गेल्या अधिवेशनावेळी आमदारांनी वृक्षारोपण केले होते. यंदाही हा उपक्रम राबवावा. पास वितरणात गोंधळ होऊ नये, पोलीस दलाशी समन्वयाने ही कामे पूर्ण करावीत,कामकाज पाहण्यासाठी येणारे नागरिक, विद्यार्थ्यांसाठी वेळ निश्चित करावी, शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह पालिका कर्मचारी, तृतियपंथी, महिलांनाही अधिवेशन पाहता यावे, याची व्यवस्था करावी, अशा सूचना खादर यांनी केल्या.
सभापती बसवराज होरट्टी म्हणाले, हिवाळी अधिवेशनासाठी येणारे मंत्री, आमदार, सचिवालयाचे अधिकारी, कर्मचारी व मार्शल्ससाठी राहण्याची व वाहतुकीसाठी व्यवस्था करावी. मंत्री, आमदारांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमध्ये तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी, सुवर्ण विधानसौधमध्येही डॉक्टरांचे पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवावी. राणी चन्नम्मा विद्यापीठ, कर्नाटक विद्यापीठ व अक्कमहादेवी विद्यापीठात अभ्यास करणाऱ्या निवडक 30 विद्यार्थ्यांच्या पथकाला जास्तीत जास्त वेळ कामकाजाची माहिती घेता यावी, यासाठी व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आतापर्यंत केलेल्या तयारीची माहिती दिली. गेल्या वर्षीप्रमाणेच अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी 12 समित्यांची स्थापना केली आहे. या समित्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे, अशी सूचना केली. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी केलेल्या पोलीस बंदोबस्ताची माहिती दिली. सुरक्षेसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस जुंपण्यात येणार आहेत. अधिवेशनासाठी येणारे अधिकारी, पोलिसांची सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बँक्वेट हॉलची पाहणी
यु. टी. खादर व बसवराज होरट्टी यांनी दोन्ही सभागृह, सेंट्रल हॉल, बँक्वेट हॉलची पाहणी केली. यावेळी विधानसभेचे उपसभाध्यक्ष रुद्राप्पा लमाणी, आमदार राजू सेठ, विधानसभेच्या सचिव आर. विशालाक्षी, विधान परिषदेच्या सचिव महालक्ष्मी, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आदी उपस्थित होते.