राज्य पोलीस महासंचालकांकडून अधिवेशन बंदोबस्ताचा आढावा
बेळगाव : राज्य पोलीस महासंचालक डॉ. अलोक मोहन यांनी बुधवारी बेळगाव येथे पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विधिमंडळ अधिवेशन बंदोबस्ताचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक आर. हितेंद्र हेही उपस्थित होते. बुधवारी सकाळी राज्य पोलीस महासंचालकांचे बेळगावात आगमन झाले. सुरुवातीला पोलीस मुख्यालयात बेळगाव उत्तर विभागातील सर्व पोलीसप्रमुखांची बैठक घेऊन त्यांनी गुन्हेगारी प्रकरणे, कायदा व सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेतला. तत्पूर्वी पोलीस मुख्यालयात त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकाश, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्यासह शहरातील अधिकारीही उपस्थित होते. दुपारी पोलीस आयुक्त कार्यालयाला भेट देऊन शहरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, उपायुक्त रोहन जगदीश, पी. व्ही. स्नेहा यांच्यासह शहरातील सर्व एसीपी व पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत भाग घेतला होता. आढावा बैठक आटोपून सायंकाळी ते बेंगळूरला रवाना झाले.