विमानतळ विस्तारीकरणाचा जिल्हा प्रशासनाकडून आढावा
विमानतळ प्राधिकारण, जिल्हा प्रशासन, एअरमन ट्रेनिंग स्कूलची संयुक्त बैठक
बेळगाव : सांबरा येथील बेळगाव विमानतळाचा विकास केला जात आहे. विकासकामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी विमानतळ प्राधिकारण, जिल्हा प्रशासन व एअरमन ट्रेनिंग स्कूलची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बेळगावचे प्रांताधिकारी श्रवण नाईक यांच्या उपस्थितीत विकासकामांबाबत चर्चा झाली. बेळगाव विमानतळाचे नूतनीकरण केले जात आहे. नवीन टर्मिनल इमारत उभारली जात असून एकाचवेळी 2400 प्रवासी हाताळण्याची क्षमता या इमारतीत असणार आहे. विमान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन विस्तारीकरण सुरू आहे. 19600 चौरस मीटर अशा विस्तीर्ण जागेमध्ये नवे टर्मिनल उभारले जात असून 700 वाहने पार्किंग केली जातील अशी व्यवस्थाही केली जाणार आहे. अंदाजे 322 कोटी रुपये खर्च करून नवीन टर्मिनल उभारले जाणार असल्याने जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
अतिरिक्त 56 एकर जागेबाबतही चर्चा
या बैठकीदरम्यान विमानतळाला आवश्यक असलेल्या अतिरिक्त 56 एकर जागेबाबतही चर्चा झाली. विमानतळ प्राधिकरणाने श्रवण नाईक यांना विस्तारीकरणाचे नकाशे दाखविले. जिल्हा प्रशासनातर्फे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी विमानतळ प्राधिकरणाने केली. यावेळी बेळगाव विमानतळाचे संचालक त्यागराजन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.