आढावा बैठकीत आचरा सरपंचानी वाचला समस्यांचा पाढा
वीज वितरण, बांधकाम, आरोग्य विभागाला धरले धारेवर
आचरा प्रतिनिधी
आचरा गावात वीज समस्या वाढली आहे. गावातील कोणत्या ना कोणत्या वाडीत रोज काही ना काही वीज समस्या निर्माण होत आहे. लाईनवरच्या झाडी सफाईसाठी आणलेली गाडी नावाला काम करुन गेली. वाडीवाडीवरील लाईनवरची झाडी तशीच आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. पुर्वी नव्हती एवढी वीजेची समस्या वाढली आहे. बांधकाम विभाग पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करत आहे. लोकांचा उद्रेक होण्याची वाट बघू नका. समस्यांचे तातडीने निवारण करा अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरे जायला तयार रहा. असा इशारा आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस यांनी दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आचरा पोलीस स्टेशन येथे आयोजित नियोजन बैठकीत सरपंच फर्नांडीस यांनी वीज वितरण, बांधकाम, आरोग्य विभागामुळे असणाऱ्या समस्यांचा पाढा वाचत अधिकाऱ्यांना धरेवर धरले.आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वीज मंडळ, आरोग्य विभाग,एसटी महामंडळ बांधकाम विभाग,बंदर विभाग आदी विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आचरा पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी सध्या सुरू असलेल्या वीज समस्येबाबत सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी रोष व्यक्त केला. यावेळी बैठकीनंतर आलेल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत खडे बोल सुनावले. प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे वेळेवर मिळत नसलेल्या जन्म दाखल्याबाबत,अपु-या औषध साठ्याबाबत उपस्थित आरोग्य विभागाच्या भगत यांना प्रश्न विचारत धारेवर धरले. सरपंच फर्नांडिस यांनी औषधसाठा अपुरा होता तर ग्रामपंचायतला कल्पना का दिली नाही. आवश्यक तो मागवून घ्या. चतुर्थी कालावधीत औषधे कमी पडू देवू नका . आवश्यकता असल्यास आम्हाला सांगा. ग्रामपंचायततर्फे औषधे उपलब्ध करून देवू असे सांगत आरोग्य सुविधेबाबत दक्ष राहण्याची सुचना सरपंच फर्नांडिस यांनी आरोग्य विभाग कर्मचारी भगत यांना केली. या बैठकीत पोलीस निरीक्षक पोवार यांनी आठवडा बाजारादिवशी एक दिशा वाहतूक सुरू ठेवण्याबाबत या मिटिंगमध्ये विषय उपस्थित केला.यावर चर्चा करून व्यापारी आणि लोकांच्या सेवेसाठी बाजारातून बंदर बाजूने आचरा तिठ्याकडील दिशेने रिक्षा वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. चतुर्थी कालावधीतील आठवडा बाजारासाठी विक्रेत्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र बॅंके पुढेही विक्रेत्यांना विक्रीस बसण्यासाठी मुभा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीला आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, बंदर विभागाचे अरविंद परदेशी, महावितरणचे सौरभ कुमार वर्मा ओम विश्वनाथ शिंदे , प्राथमिक आरोग्य केंद्र आचराचे नित्यानंद भगत, हिवाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे राजाराम परब ,आचरा वाहतूक नियंत्रक गजानन इंगळे ,ट्रॅव्हलर्सचे उमेश बाणे,किरण साटम, विनायक सावंत, मंदार नाटेकर,सुफियान काझी,रिक्षा संघटनेचे हर्षद जाधव ,सचिन परब ,कमलेश पाटकर, सतीश तळवडकर यांसह पोलीस कर्मचारी जाधव,मनोज पुजारे आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते.