आतापर्यंत 15,145 कोटींचा महसूल जमा
मंत्री कृष्णभैरेगौडा यांची विधानपरिषदेत माहिती : यंदा 20 टक्के अधिक महसूल संकलनाचे उद्दिष्ट
बेंगळूर : राज्यात आतापर्यंत 15,145.32 कोटींचा महसूल जमा झाला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा अधिक महसूल जमा होईल, असा विश्वास महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी व्यक्त केला. बुधवारी विधानपरिषदेत सदस्य शशील नमोशी यांनी विचारलेल्या चिन्हांकित प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. यंदा 20 टक्के अधिक महसूल संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात प्रत्यक्ष खाते वापरून नोंदणी करताना खोटे ओळखपत्र तयार करणे, खोटा पीआयडी क्रमांक तयार करणे आणि सरकारी मालमत्ता, निरपराध लोकांची मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर नोंदविणे, नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची फसवणूक, फसव्या नोंदणीसह बेकायदेशीर नोंदणीची प्रकरणे रोखण्यात आली आहेत. ई-खाते समाविष्ट केल्यानंतर बेकायदेशीर व बोगस दस्तऐवज तयार करून नोंदणी करण्याचे प्रमाण कमी झाले असून कायदेशीर स्थावर मालमत्तेच्या नोंदणीमुळे शासनाचे कोणतेही महसूल नुकसान होणार नाही, अशी माहितीही मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी दिली.
यंदा 5022 धर्मादाय खात्याच्या संपत्तीचे जतन
राज्यात धर्मादाय खात्याच्या संपत्तीचे संवर्धन अभियानाच्या धर्तीवर हाती घेण्यात येत आहे, असे महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी सांगितले. विधानपरिषदेत सदस्य रविकुमार यांनी विचारलेल्या चिन्हांकित प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. यावषी राज्यात 5022 धर्मादाय खात्याच्या संपत्तीची धर्मादाय खात्याच्या नावावर नोंदणी करून जतन केल्या आहेत. आमचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील धर्मादाय खात्याच्या संपत्तीच्या जतनाला प्राधान्य देण्यात आले. श्रीरंगपट्टणमधील श्री रंगनाथस्वामी मंदिराला दान केलेल्या 1198.34 एकर जागेतील अतिक्रमण झालेल्या जमिनीच्या मुद्यावर सरकारने गांभीर्याने विचार केला असून अतिक्रमित जमीन मोकळी करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही ते म्हणाले.